राष्ट्रवादीची आघाडीला धोबीपछाड
By admin | Published: January 4, 2017 11:47 PM2017-01-04T23:47:48+5:302017-01-04T23:47:48+5:30
इस्लामपूर : उपनगराध्यक्षपदी दादासाहेब पाटील; महाडिक, जाधव, डांगे स्वीकृत सदस्य
इस्लामपूर : उत्सुकता ताणून धरलेल्या इस्लामपूरच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत अपक्ष उमेदवार दादासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बाजी मारली. विकास आघाडीच्या अन्नपूर्णा फल्ले यांचा १५ विरुद्ध १४ अशा मतांनी दादासाहेब पाटील यांनी पराभव केला, तर स्वीकृत सदस्य म्हणून विकास आघाडीचे सतीश महाडिक, तर राष्ट्रवादीकडून खंडेराव जाधव, अॅड. चिमण डांगे यांना संधी मिळाली. या निवडीतून राष्ट्रवादीने विकास आघाडीला धोबीपछाड दिला.
नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्वीकृत सदस्य निवडीसाठी बुधवारी विशेष सभा झाली. मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची प्रमुख उपस्थिती होती. दुपारी बाराला सभेला सुरुवात झाली. त्यापूर्वी प्रभाग ११ ‘ब’ मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दादासाहेब तुकाराम पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर विकास आघाडीच्यावतीने अन्नपूर्णा गजानन फल्ले व शिवसेनेच्या शकील आदम सय्यद यांनी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पाटील यांनी पाचही अर्ज वैध ठरल्याचे सांगत माघारीसाठी वेळ दिला. त्यानंतर शिवसेनेच्या सय्यद यांनी माघार घेतल्याने अन्नपूर्णा फल्ले व पाटील यांच्यासाठी मतदान
झाले.
विकास आघाडीचे गटनेते विक्रम पाटील, शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार यांनी नगरसेवकांना त्यांच्या पसंतीनुसार मतदान करता यावे, त्यांच्या हक्कावर गदा येऊ नये, त्यासाठी गुप्त मतदान घेण्याची मागणी करून पीठासन अधिकाऱ्यांनी अधिकार वापरावेत, असे म्हणत खळबळ माजविली. यावेळी राष्ट्रवादी व आघाडीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक शेरेबाजी झाली. राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे, विश्वनाथ डांगे यांनी कायद्यात गुप्त मतदानाची तरतूद नाही, असे स्पष्ट केले. या गदारोळात नगराध्यक्ष पाटील यांनी कायद्यातील तरतुदीनुसार गुप्त मतदान घेता येत नाही, असे सांगत अर्ज फेटाळून लावले. त्यानंतर हात उंचावून झालेल्या मतदानात दादासाहेब पाटील यांना १५, तर सौ. फल्ले यांना १४ मते पडली. शेवटी नगराध्यक्ष पाटील यांनी उपनगराध्यक्षपदी दादासाहेब पाटील यांची निवड जाहीर केली.
विकास आघाडीचे सतीश महाडिक, राष्ट्रवादीचे खंडेराव जाधव, अॅड. चिमण डांगे, शिवसेनेचे सचिन कोळेकर व सागर मलगुंडे यांचे स्वीकृत सदस्यांचे नामनिर्देशन पात्र ठरले. राष्ट्रवादीच्या संपतराव पाटील यांचा पदाचा कालावधी अपुरा ठरल्याने त्यांचे नामनिर्देशन अपात्र ठरले. त्यानंतर संख्याबळानुसार राष्ट्रवादीचे जाधव, अॅड. डांगे आणि विकास आघाडीचे महाडिक यांची स्वीकृत सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली. (वार्ताहर)
रचलेली खेळी यशस्वी
नगरपालिकेत राष्ट्रवादीचे १४, तर विकास आघाडीचे आठ, शिवसेनेचे पाच आणि अपक्ष एक असे बलाबल आहे. शिवसेना विकास आघाडीसोबत आहे. त्यातच नगराध्यक्षपद विकास आघाडीकडे असल्याने सभागृहात १४-१४ असे संख्याबळ दिसते. त्यामुळे अपक्षांच्या हातात उपनगराध्यक्षपदाच्या दोऱ्या असल्याने, राष्ट्रवादीने अपक्षाला आपल्याकडे खेचत उपनगराध्यक्षपदाची ‘आॅफर’ दिली. अपक्ष दादासाहेब पाटील यांनी ती स्वीकारली आणि ते उपनगराध्यक्ष बनले.