मदनभाऊंच्या बंगल्याजवळून राष्ट्रवादीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:14 AM2018-05-15T00:14:52+5:302018-05-15T00:14:52+5:30

NCP's move towards Madanbhau bungalow | मदनभाऊंच्या बंगल्याजवळून राष्ट्रवादीच्या हालचाली

मदनभाऊंच्या बंगल्याजवळून राष्ट्रवादीच्या हालचाली

Next


सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या सांगली-मिरज रस्त्यावरील विजय बंगल्याशेजारूनच राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. राष्ट्रवादी जिल्हा परिषदेसमोरील पक्षकार्यालयाऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विजय बंगल्यासमोरील आरआयटीतून निवडणुकीच्या हालचाली करणार आहे. तशी घोषणा सोमवारी शहर पदाधिकाऱ्यांनी केली.
आमदार जयंत पाटील व मदनभाऊ पाटील यांच्यातील राजकीय सख्य संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. मदनभाऊ हयात असताना लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत जयंत पाटील यांच्याशी संघर्ष झाला होता. कधीकाळी दोघेही राष्ट्रवादीत होते. तरीही त्यांच्यात सुप्त संघर्ष होता. मदनभाऊंच्या नेतृत्वाखाली महापालिका जिंकण्यासाठी २००८ मध्ये जयंतरावांनी भाजप, जनता दल यांची महाआघाडी स्थापन केली होती. २०१३ मध्ये मदनभाऊंनी जयंतरावांना धोबीपछाड देत महापालिकेची सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जयंतरावांच्या खेळींनी मदनभाऊंना गारद केले. पण या निवडणुकीनंतर मात्र जयंतराव व मदनभाऊंमध्ये मनोमीलनाचे वारे वाहू लागले. जिल्हा बँक, मार्केट कमिटीच्या निवडणुका दोघांनीही एकत्रित लढल्या. सांगली-मिरज रस्त्यावरील विजय बंगल्यातूनच मदनभाऊंच्या राजकीय खेळ्या सुरू असायच्या. त्याशेजारीच जयंत पाटील यांच्या आरआयटीचे प्रशिक्षण केंद्र होते. विजय बंगल्याच्या पूर्व बाजूला असलेली जागाही काही वर्षापूर्वी जयंतरावांनी खरेदी केली आहे. या जागेत जयंतराव निवासस्थान बांधणार असल्याची चर्चा होती. पण अजून तरी तिथे काहीच बांधकाम झालेले नाही. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विजय बंगल्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते व इच्छुक गर्दी करू लागले आहेत. जयश्रीताई पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी साकडे घातले जात आहे. राष्ट्रवादीच्या हालचालीही विजय बंगल्याशेजारीच होणार आहेत.
शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे यांनी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे कार्यालय आरआयटीच्या इमारतीत हलविल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीकडून इच्छुकांचे अर्ज याच कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. जिल्हा कार्यालयात पक्षाच्या जिल्हा व तालुकास्तरीय बैठका असतात. त्यांना अडचण होऊ नये, यासाठी कार्यालय तात्पुरते स्थलांतरित केले आहे.
आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे!
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास १७ मेपासून सुरूवात होत आहे. सर्वसाधारण पुरूषासाठी एक हजार, महिलांसाठी पाचशे, तर मागासवर्गीय महिलांसाठी तीनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शहराच्या विकासासाठी स्वच्छ व चारित्र्यवान अराजकीय व्यक्तींनीही राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी करावी, त्यांच्या अर्जाचाही पक्ष निश्चित विचार करेल, असे बजाज व पाटील यांनी सांगितले. समविचारी पक्षांशी आघाडीबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची तयारीही केल्याचे ते म्हणाले.
विशाल पाटील बेदखल
काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. याबाबत विचारता बजाज, जगदाळे म्हणाले की, विशाल पाटील यांच्या भूमिकेबाबत त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी उत्तर दिले आहे. मुलाच्या चुकीबद्दल वडिलांनी धोपाटा घातल्यानंतर, त्यावर आपण काय बोलणार?, असे उदाहरण देत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

Web Title: NCP's move towards Madanbhau bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.