राष्ट्रवादीचा सांगलीत मोर्चा
By Admin | Published: January 9, 2017 10:54 PM2017-01-09T22:54:21+5:302017-01-09T22:54:21+5:30
नोटाबंदीला विरोध : केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
सांगली : नोटाबंदीच्या विरोधात सोमवारी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयापासून झाली. राम मंदिर, कॉँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. आंदोलनात आ. सुमनताई पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, राष्ट्रवादीचे नेते इलियास नायकवडी, शंकरदादा पाटील, माजी आ. विलासराव शिंदे, मनोज शिंदे, महापालिका स्थायी समिती सभापती संगीता हारगे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, बाबासाहेब मुळीक, पी. आर. पाटील, ताजुद्दिन तांबोळी, वैभव शिंदे, राहुल पवार, बाळासाहेब होनमोरे, बी. के. पाटील, विराज नाईक, सागर घोडके, वसुधा कुंभार, अनिता पांगम, छाया जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इशारा नेत्यांचा : सदाभाऊंना गावबंदीचा
शेतकऱ्यांच्या जिवावर राजकारण करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आता त्यांची कोणतीही फिकीर नाही. शेतकरी संकटात असताना, ते ही परिस्थिती मान्य करीत नाहीत. खुर्ची बदलली की चष्मा बदलतो, याचे हे उदाहरण आहे. त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही, तर जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्यांना प्रवेशबंदी करावी लागेल, असा इशारा दिलीपतात्या पाटील यांनी दिला. जयंत पाटील यांनीही नामोल्लेख न करता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली.
कोण, काय म्हणाले
जयंत पाटील : रघुराम राजन यांनी देशातील ठराविक धनिकांच्याकडील थकीत कर्जे तातडीने वसूल करण्याबाबत चार ते पाच पत्रे दिली होती. त्यांच्या या सूचनेने धनिकांची लॉबी जागी झाली आणि त्यांनी मोदींना हाताशी धरून राजन यांनाच पदावरून हटविले. याच धनिकांकडे अडकलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी माफ करण्याच्या उद्देशानेच मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. काळा पैसा जमा होईल आणि त्यातून या धनिकांचा फायदा करून देता येईल, असे गणित त्यांनी आखले होते. नोटाबंदीचा निर्णयच फसल्याने त्यांचे हे मनसुबे यशस्वी झाले नाहीत, मात्र गरीब जनता यात भरडली जात आहे. देशातील प्रत्येक घटकाला वेठीस धरण्याचा उद्योग आता सुरू झाला आहे. जिल्हा बॅँकेनंतर आता अंमलबजावणी संचालनालयामार्फत सुवर्ण व्यावसायिकांना वेठीस धरले जात आहे. एकही घटक या निर्णयाच्या धक्क्यातून सावरलेला नाही. आर्थिक समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे जोपर्यंत सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना आणि कष्टकरी जनतेला या निर्णयाच्या कचाट्यातून सोडविले जात नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी आंदोलन करेल, असे ते म्हणाले.
अण्णा डांगे : नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा होणार की तोटा, हे आता काळच ठरवेल. कोणतेही नियोजन न करता हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने सामान्य जनता आता अडचणीत सापडली आहे. जिल्हा बॅँकांप्रमाणे पतसंस्थाही अडचणीत आल्या आहेत. शासनाने ही परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा लोकांना हे सरकारच बदलावे लागेल.
दिलीपतात्या पाटील : (जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष ) जी व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलते, त्याच्याविरोधात षड्यंत्र रचण्याचे काम केले जात आहे. जिल्हा बॅँकेला अडचणीत आणण्याचे कामही याच षड्यंत्राचा भाग आहे. देशातल्या तपासणी करणाऱ्या सर्व यंत्रणा आता दमल्या. आता मोदी आणि जेटली जिल्हा बॅँकेच्या तपासणीसाठी येणार आहेत.