राष्ट्रवादीचा न मागता पाठिंबा कशासाठी?
By admin | Published: July 5, 2015 10:53 PM2015-07-05T22:53:12+5:302015-07-06T00:24:08+5:30
राजू शेट्टी : आताच्या परिस्थितीला शरद पवारच कारणीभूत
सांगली : सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा सल्ला आम्हाला देणाऱ्या आ. जयंत पाटील यांनी, अगोदर भाजप सरकारला न मागता पाठिंबा कशासाठी दिला?, या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे. ऊस दराच्या सध्याच्या परिस्थितीला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारच कारणीभूत आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे.
प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेच भाजपला न मागता पाठिंबा जाहीर केला होता. त्यामागचा त्यांचा हेतू काय होता? याचा खुलासा जयंतरावांनी करावा. सत्तेत असूनही स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून सरकारशी दोन हात करीत आहे. जयंतरावांनी पंधरा वर्षे मंत्री असताना उसाच्या दराबाबत कधी तोंड तरी उघडले होते का? एफआरपी साखरेच्या दरावर कधीच ठरविली जात नाही. कृषिमूल्य आयोगाने महागाईचा निर्देशांक गृहित धरून तसेच उसासाठी लागणारे बियाणे, वीज, पाणी, घसारा, मजुरी आदी गोष्टींसंदर्भात राज्य सरकारकडून माहिती मागवून घेऊन एफआरपी ठरविली जाते. जयंत पाटील यांनी अगोदर या गोष्टीचा अभ्यास करावा आणि मगच भाष्य करावे.
गेल्या दहा वर्षात साखर निर्यातीचे धोरण कोणी घेतले? त्यावेळी साखर आयात कोणी केली, निर्यात कोणी केली? एकूणच या व्यवहारात कोणाचा आर्थिक फायदा झाला, या सर्व गोष्टींच्या चौकशीची मागणी जयंतरावांनी करावी. अशी मागणी केल्यास आपण त्यांना लगेच पाठिंबा जाहीर करू.
साखरेच्या दराचे कारण सांगून शेतकऱ्यांना फसविण्याचे उद्योग बंद करावेत. पवारांच्या कालावधित साखरेचे दर अनेकदा पाडण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना अनुदान का दिले गेले नाही? शेतकऱ्यांना एफआरपी मिळावा म्हणून जयंत पाटील यांनी आजवर काय प्रयत्न केलेत, ते अगोदर स्पष्ट करावे. याउलट स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोणते प्रयत्न केले, त्याचा हिशेब देण्यास आम्ही तयार आहोत. (प्रतिनिधी)
नागपंचमीसाठी काय केले?
गेल्या पाच वर्षात केंद्रात व राज्यात जयंत पाटील यांचीच सत्ता होती. ते स्वत: एक जबाबदार मंत्री होते. शिराळ्यातील नागपंचमीसाठी त्यांनी काय केले, याचा खुलासा करावा. सत्ता गेल्यामुळे जयंतराव बिथरले आहेत. सत्तेशिवाय जगणे त्यांना असह्य होत आहे. त्यामुळेच त्यांची केविलवाणी धडपड सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
...तर पाठिंबा काढला असता
आमच्या एका पक्षाचा पाठिंबा काढून घेण्याने सरकार कोसळत असते, तर आम्ही केव्हाच पाठिंबा काढून घेतला असता, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत आणि भाजपचे शिवाजीराव नाईक मंत्री झाले, तर आपली काय अवस्था होईल, याची जयंतरावांना धास्ती लागली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.