निसर्गाप्रती संवेदनशीलता जपण्याची गरज
By admin | Published: June 26, 2016 11:20 PM2016-06-26T23:20:43+5:302016-06-27T00:45:04+5:30
अरुणा ढेरे : सांगलीत दुसरे निसर्ग साहित्य संमेलन उत्साहात
सांगली : संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई असो की कुसुमाग्रज, सदानंद रेगेंपर्यंत सर्वांनी निसर्गाबाबतची संवेदनशीलता साहित्य, अभंग, कवितांमधून मांडलेली आहे. आजच्या विज्ञानयुगात निसर्गाप्रती आपली संवेदनशीलता कमी होत चालली आहे. ही संवेदना जपण्याची गरज आहे, असे मत संमेलनाध्यक्षा तथा ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले.
येथील आभाळमाया फाऊंडेशनच्यावतीने दुसरे निसर्ग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून श्रीमती ढेरे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते वृक्षारोपण करून संमेलनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास प्रमोद चौगुले, तारा भवाळकर, मदनलाल रजपूत, वैजनाथ महाजन उपस्थित होते.
ढेरे म्हणाल्या, साहित्यिकांनी आपल्या कवितांमधून निसर्गातील उदाहरणे देऊन जगण्याच्या व्याख्या व्यक्त केल्या आहेत. जुन्या मराठी कवितांमध्ये निसर्गप्रेमाचा धागा फार पूर्वीपासूनच आहे. ज्ञानेश्वर, बहिणाबार्इंसह अनेक संतांनी निसर्गाचे महत्त्व पटवून दिले आहे. अगदी अलीकडच्या साहित्य, कवितांतून निसर्गाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
आपण आपल्या रोजच्या धावपळीत निसर्गाकडे कधी पाहातच नाही. दिवसातून एकदाही आपण आभाळाकडे आभाळ म्हणून, तर झाडाकडे झाड म्हणून बघत नाही. विज्ञानयुगात निसर्गाप्रती संवेदना कमी झाली आहे. साहित्य, विज्ञान आणि निसर्ग यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे ही संवेदनशीलता कमी न होता जपण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्वाधिक संबंध निसर्गाशी येतो. आपण जीवन जगत असताना निसर्गाचा विचार करून निसर्गाचे संवर्धन करायला हवे आणि पुढच्या पिढीलादेखील तसे संस्कार करावेत. निसर्गाचे संवर्धन झाले नाही, तर विनाश अटळ आहे.
यावेळी सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलनही झाले. यात प्रा. प्रदीप पाटील, चंद्रकांत बाबर, मनीषा पाटील, प्रा. सुनंदा शेळके, अभिजित पाटील, वसंत पाटील, भीमराव धुळूबुळू, महेश कराडकर, धनदत्त बोरगावे, नीलम माणगावे यांनी भाग घेतला. कवी संमेलनाला निसर्गप्रेमींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)