आयुष्य घडविण्यासाठी वाचनाची गरज : भवाळकर

By admin | Published: January 7, 2015 11:08 PM2015-01-07T23:08:09+5:302015-01-07T23:24:52+5:30

ग्रंथ महोत्सवास प्रारंभ : सांगलीत ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

Need for reading life: Bhawalkar | आयुष्य घडविण्यासाठी वाचनाची गरज : भवाळकर

आयुष्य घडविण्यासाठी वाचनाची गरज : भवाळकर

Next

सांगली : वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने प्रत्येकाने वाचन करणे आवश्यक आहे. आयुष्य घडविण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड आत्मसात केली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांनी केले. माध्यमिक शिक्षण विभाग आणि प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आज, बुधवारी भवाळकर बोलत होत्या.
सकाळी जिल्हा परिषदेपासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये शांतिनिकेतन विद्यापीठ व अन्य शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दिंडीच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी लेझीमच्या साथीने ताल धरला होता. ग्रंथ महोत्सवानिमित्त शांतिनिकेतन विद्यापीठात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भवाळकर म्हणाल्या की, विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. वाचनाचे वातावरण निर्माण होण्यासाठी शिक्षक व पालकांनी स्वत: वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक शालेय वर्गासाठी स्वतंत्रपणे ग्रंथपेटीचा उपक्रम राबविला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ ग्रंथ वाचा असे न सांगता, त्यावर विचार करा, शंका असल्यास त्यांचे निरसन करा, असे सांगितले पाहिजे.
लेखिका इंदुमती जोंधळे म्हणाल्या की, अभ्यास म्हणजे एक प्रकारचे वाचनच आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेली पाठ्यपुस्तके समजून घेतली पाहिजेत. त्याचप्रमाणे चांगल्या ग्रंथांचे वाचन करुन त्यावर चिंतन केले पाहिजे. केवळ पुस्तकी वाचन करुन उपयोग नाही, तर आजूबाजूचा परिसर, आपल्याला भेटणारी माणसेदेखील वाचायला शिकले पाहिजे. यावेळी जोंधळे यांनी त्यांना लहानपणी आलेले दाहक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन यांनी, पुस्तके आपल्याला विवेकशील बनवित असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावावी, असे आवाहन केले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर यादव यांनी, बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांची वाचनशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘ई-बुक्स’ वाचण्यासाठी प्रवृत्त करावे, असे मत मांडले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, शिक्षणाधिकारी (निरंतर) नीशादेवी वाघमोडे, बांधकाम आणि आरोग्य सभापती गजानन कोठावळे, ‘शांतिनिकेतन’चे गौतम पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)

वेळेचे नियोजन नाही
कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने व लांबत गेल्याने सर्व विद्यार्थी कंटाळले होते. पुढील परिसंवादासाठी नियोजित वेळेत आलेल्या मान्यवरांना दोन तासांहून अधिक वेळ श्रोत्यांमध्ये थांबावे लागल्याचे लक्षात येताच भवाळकर यांनी,‘संयोजकांनी वेळेचे नियोजन व्यवस्थित न केल्याने ही शिक्षा आपल्या वाट्याला आली आहे’ असे सांगून अवघ्या १० ते १५ मिनिटातच मनोगत आटोपते घेतले.

Web Title: Need for reading life: Bhawalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.