जातीयवाद्यांना रोखण्याची गरज : पतंगराव कदम
By Admin | Published: October 2, 2014 11:45 PM2014-10-02T23:45:57+5:302014-10-02T23:48:28+5:30
उपाळे मायणी येथील सभेत आवाहन
तोंडोली : महात्मा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत हौतात्म्य व त्यागाची खूप मोठी परंपरा काँग्रेस पक्षाला लाभलेली आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून द्यायचे काम काँग्रेसनेच केले. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या जायीयवादी प्रवृत्तींना थारा देऊ नका, असे आवाहन माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केले.
उपाळे (मायणी), उपाळे वांगी (ता. कडेगाव) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष भीमराव मोहिते, उपसभापती विठ्ठल मुळीक, आनंदराव मोहिते, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सतीश पाटील, शंकर घार्गे, रावसाहेब घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कदम म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १0५ जणांनी हौतात्म्य पत्करले. आज मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कुटिल डाव महाराष्ट्रातील जनता कदापीही खपवून घेणार नाही. महाराष्ट्रावर दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या संकटांवेळी मदत व पुनर्वसन खात्यामार्फत १२,000 कोटी रुपयांचा निधी दिला. दुष्काळी भागासाठी ताकारी, टेंभू, म्हैसाळसारख्या जलसिंचन योजना आणल्या. भारती विद्यापीठ व विविध संस्थांच्या माध्यमातून हजारो लोकांना काम दिले. यापुढेही सर्वांना बरोबर घेऊन विकासाची ही गंगा सर्वांपर्यंत नेली जाणार असून, जातीयवाद्यांच्या आश्रयाला गेलेल्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी उत्तम बापू, संतोष कदम, महिपती चव्हाण, शशिकांत काटरे, आप्पालाल काटरे, संजय काटकर, युवराज पवार, हशेन मुलाणी, रामभाऊ सरगर, विनायक कदम, मच्छिंद्र घार्गे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉ. कदम यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच मोहनराव गोरड, सागर घाडगे, विक्रम चव्हाण, सुरेश घार्गे, सागर घार्गे, विकास पाटील, सत्यजित यादव—देशमुख, बाळकृष्ण यादव आदी कार्यकर्त्यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास मोहन गोरड, बाळासाहेब पाटील, महादेव देशमुख, उत्तम काटरे, बबन शेवाळे, सोपान कुंभार, संतोष कुंभार, किशोर पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)