पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांविरोधात संघटित लढण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:26 AM2021-05-21T04:26:53+5:302021-05-21T04:26:53+5:30

शिराळा : हवामानातील बदल जगासाठी विनाशकारी धोक्याची घंटा आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम गरीब, ...

The need for a united fight against those who harm the environment | पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांविरोधात संघटित लढण्याची गरज

पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांविरोधात संघटित लढण्याची गरज

Next

शिराळा :

हवामानातील बदल जगासाठी विनाशकारी धोक्याची घंटा आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरीवर्गावर होत आहे. या घटकांना संघटित करून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या भांडवलदार आणि सरकारविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. शिवा दुबे यांनी केले.

'पर्यावरण समृद्धी मंच शिराळा' या समूहाने ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले आहे.

या उपक्रमांतर्गत एस. ए. पी.सी. सी. या संस्थेच्या समन्वयक प्रा. शिवा दुबे (मुंबई) आणि पर्यावरण कार्यकर्ती नुपूर रिसबूड (बेंगलोर) यांनी 'वातावरण बदलाचे परिणाम व पर्यायी न्याय व्यवस्था' याविषयी विचार मांडले.

प्रा. शिवा दुबे म्हणाल्या, वातावरण बदलाचा परिणाम पंचमहाभुतावर होत आहे. पर्यावरण ऱ्हासाबरोबर आर्थिक विषमतादेखील वाढत आहे. अमेरिका, युरोपातील औद्योगिकीकरणाने जगाला धोका निर्माण झाला आहे. सरकारांची नीती ही मोठ्या उद्योगधार्जिणी असल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. पर्यावरण चळवळीकडे जगाचे लक्ष वेधणारी ग्रेटा थनबर्गने लहान मुले, मुली यांच्यामार्फत पर्यावरण बदलास सुरुवात केली आहे. आपणही पर्यावरण संवर्धनासाठी जागृत झाले पाहिजे. पर्यावरणाचे नुकसान करणारे घटक शोधून त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. शासनाच्या पर्यावरण व्यवस्थेमधील कायदे व प्रक्रिया या व्यवस्थेमध्ये आपण भारतात शेतकरी, आदिवासी, गरीब लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे. हवामान बदलाचे परिणाम गरीब, शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. पर्यावरणाचे नुकसान करणारे श्रीमंत देश आणि भांडवलदार हे मात्र सुरक्षित आहेत. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ आणि कोरोनासारख्या साथीत शहरातील झोपडपट्टीत राहणारे मजूर, शेतकरी आणि आदिवासी यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. उद्योगधंदे, पर्यावरण उपाययोजनासंदर्भात शासनाची उदासीनता आहे.

पर्यावरण अभ्यासक नुपूर रिसबूड म्हणाल्या, सध्याची कोरोना परिस्थिती आणि वारंवार होणारी चक्रीवादळे हेदेखील वातावरण बदलाचे परिणाम आहेत. पहिल्यांदा माणसाने मर्यादा तोडली आहे. त्यामुळेच निसर्ग त्याची मर्यादा सोडत आहे. आता मानवजातीच्या कल्याणासाठी पर्यावरण संवर्धनाकडे सजगतेने बघण्याची गरज आहे.

सचिन करमाळे यांनी स्वागत केले. जलनायक प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र लोकरे यांनी सूत्रसंचालन केले. महादेव हवालदार यांनी आभार मानले. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, पर्यावरणतज्ज्ञ मोहन पराजणे, गंगाराम पाटील, प्रा. स्मिता जांभळी, प्रदीप पाटणकर, सुप्रिया घोरपडे, अक्षय जहागीरदार, करुणा कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: The need for a united fight against those who harm the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.