वृद्ध मातापित्याचे संगोपन सक्तीचे करणाऱ्या नरवाड ग्रामपंचायतीची निलम गोऱ्हे यांनी घेतली दखल
By संतोष भिसे | Published: February 4, 2024 04:17 PM2024-02-04T16:17:47+5:302024-02-04T16:18:34+5:30
सरपंच मारुती जमादार यांनी सांगितले की, या ठरावामुळे आईवडिलांना न सांभाळणाऱ्यांना चांगलाच कानमंत्र मिळाला आहे.
नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथील ग्रामसभेत ''माता-पित्यांचा सांभाळ न केल्यास मालमत्ता विसरा'' असा ठराव झाला होता. त्याची दखल विधान परिषदेच्या उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांनी घेतली असून ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे. गावाच्या भेटीसाठी त्या लवकरच येणार आहेत.
या ठरावाबाबतचे वृत्त लोकमतमधून प्रसिद्ध केले होते. ते गोऱ्हे यांच्या वाचनात आले.
सरपंच मारुती जमादार यांनी सांगितले की, या ठरावामुळे आईवडिलांना न सांभाळणाऱ्यांना चांगलाच कानमंत्र मिळाला आहे. चांगल्या व विधायक कामांची पाठराखण लोकमत करीत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दरम्यान, लोकमतमध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सरपंच मारुती जमादार यांना राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामसभेत झालेल्या ठरावाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना सरपंचांनी विविध विभागांना दिल्या आहेत. आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना यापुढे रेशनचा लाभ मिळणार नाही. महसूल विभागात वारस नोंद, आरोग्य विभागाच्या सवलती यांना ग्रामपंचायतीने ब्रेक लावला आहे. हा ठराव झाल्यापासून गावाच्या मानसिकतेत मोठा बदल झाला आहे. नात्यांचे तुटलेले धागे पुन्हा घट्ट होऊ लागले आहेत. मुलाबाळांपासून दुरावलेल्या वृद्ध मातापित्यांच्या चेहऱ्यावरील हरविलेले हसू पुन्हा खुलू लागले आहे.