‘नीट’च्या अॅडमिट कार्डने फोडला विद्यार्थ्यांना घाम, संकेतस्थळ हँग
By अविनाश कोळी | Published: May 2, 2024 08:12 PM2024-05-02T20:12:07+5:302024-05-02T20:12:22+5:30
तक्रारीनंतर काहीप्रमाणात दिलासा
सांगली: वैद्यकीय प्रवेशासाठीची ‘नीट’ परीक्षा येत्या ५ मे रोजी घेण्यात येणार असून या परीक्षेसाठीचे अॅडमिट कार्ड १ मे रोजी रात्री उशिरा ऑनलाईन पध्दतीने जारी करण्यात आले आहेत. मात्र, बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर संकेतस्थळ हँग झाल्याने अॅडमिट कार्ड डाऊनलोड करताना विद्यार्थ्यांना घाम फुटला. गुरुवारी रात्री उशिरा काही प्रमाणात यंत्रणा सुधारल्याने काही विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच अॅडमिट कार्ड मिळणे अपेक्षित होते, परंतु नीट परीक्षेसाठी अवघे तीन ते चार दिवस बाकी असताना राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे कार्ड जारी करण्यात आलेले आहेत.त्यातच राष्ट्रीय परीक्षा एजन्सी - नीटची वेबसाईट व्यवस्थित चालू नसल्यामुळे कार्ड डाऊनलोड करताना विद्यार्थ्यांना घाम फुटला. कार्ड डाऊनलोड होण्यास खूप जास्त वेळ लागणे, कार्ड प्रिंट न होणे, कार्डवरील
फोटो व सही न दिसणे अशा तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक त्रासास सामोरे जावे लागले. या बाबीकडे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने त्वरित लक्ष देऊन त्यांच्या वेबसाईट मधील त्रुटी सुधाराव्यात, अशी मागणी एजन्सीकडे करण्यात आली. तक्रारी दाखल होताच त्याची दखल घेत राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने काहीप्रमाणात सुधारणा केल्याने काहींना अॅडमिट कार्ड मिळाले. तरीही अजून अनेक विद्यार्थ्यांना या समस्याचा सामना करावा लागत आहे.
वेबसाईटच्या समस्येसाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडे तक्रार नोंदविल्यानंतर गुरुवारी काही प्रमाणात यंत्रणा सुरळीत झाली आहे. शुक्रवारपर्यंत ती पूर्णपणे सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. कार्ड डाऊनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी घरूनच त्यावर पासपोर्ट आणि पोस्टकार्ड साईजचा फोटो चिटकवून न्यायचा आहे. त्याचप्रमाणे पहिल्या पानावर दिलेल्या चौकटीत डाव्या हाताचा अंगठा उमटवायचा आहे.कार्डवर सही परीक्षा केंद्रामध्ये परीक्षाकासमोर करायची आहे.-डॉ. परवेज नाईकवाडे
वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली