‘सीईओं’कडून ठेकेदारांची कानउघाडणी
By admin | Published: May 13, 2014 12:40 AM2014-05-13T00:40:41+5:302014-05-13T00:40:41+5:30
पैसे देऊ नका : पंधरा दिवसांत कामे पूर्ण न केल्यास फौजदारी
सांगली : ठेकेदारांनी ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती आणि गावांमधील समित्यांच्या पदाधिकार्यांना एक रूपयाही देऊ नका. कुणी पैसे मागितलेच, तर माझ्याशी संपर्क साधा, जाग्यावर त्या अधिकारी, कर्मचार्यास घरी घालविण्यात येईल. पदाधिकारी पैसे मागत असतील, तर त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येईल. पण, ठेकेदारांनी पंधरा दिवसांत कामे पूर्ण केली पाहिजेत, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी ठेकेदारांना दिला. जिल्ह्यातील ६९ गावांतील अपूर्ण पाणी पुरवठा योजनांच्या पार्श्वभूमीवर ठेकेदार, अधिकार्यांची जिल्हा परिषदेत बैठक झाली. या बैठकीनंतर लोखंडे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील पाणी योजनेवर वर्धित वेग, स्वजलधारा, भारत निर्माण आणि पेयजल योजनेच्या माध्यमातून शासन कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. तरीही ठेकेदार पाणी पुरवठा योजनांची कामे वर्षानुवर्षे पूर्ण करीत नाहीत. ठेकेदारांनी गावातील सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचार्यांना एक रूपयाही देऊ नये. ठेकेदारांनीही बोगसगिरी करू नये, कोणत्याही कामात गोलमाल करण्याचा प्रयत्न करू नये, तुम्ही कामे करेक्ट करा. यातूनही एखादा अधिकारी, कर्मचारी पैसे मागत असेल, तर माझ्याशी संपर्क साधावा. जो कोण पैसे मागत असेल त्याला घरी घालविले जाईल, असा इशाराही लोखंडे यांनी दिला. ते म्हणाले की, ठेकेदारांच्या समस्या सोडविल्या जातील. शासनाच्या आराखड्यानुसारच काम झाले पाहिजे. कोणत्याही कामात गोलमाल चालणार नाही. कामात त्रुटी नसतील, तर ठेकेदारांना अधिकार्यांच्या मागे लागण्याची गरजच नाही. पहिल्या टप्प्याची कामे पूर्ण झाल्यानंतर दुसर्या टप्प्यातील निधी लगेच मिळेल. (प्रतिनिधी)