Sangli: चांदोली धरण, वारणा नदीतील दुर्घटना रोखणार कशी?; सुरक्षा व्यवस्थेची ऐशी-तैशी

By संतोष भिसे | Published: May 11, 2024 04:00 PM2024-05-11T16:00:36+5:302024-05-11T16:01:09+5:30

जलसंपदा विभागाला नाही गांभीर्य

Neglect of the administration towards the safety system of dangerous and accident-prone places in Chandoli Dam, Warna River | Sangli: चांदोली धरण, वारणा नदीतील दुर्घटना रोखणार कशी?; सुरक्षा व्यवस्थेची ऐशी-तैशी

Sangli: चांदोली धरण, वारणा नदीतील दुर्घटना रोखणार कशी?; सुरक्षा व्यवस्थेची ऐशी-तैशी

आनंदा सुतार

वारणावती : चांदोली पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा स्तर उंचाविताना पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. चांदोली धरण व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या पर्यटन स्थळाबरोबर धरणाच्या पायथ्याला निसर्गरम्य वातावरणात भोजन करण्याच्या व पोहण्याच्या उद्देशाने अनेक पर्यटक सहकुटुंब येतात. या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटना रोखणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले जाते, तेथून वारणा नदी पात्रात प्रवाहित होते. याठिकाणी पर्यटकांना पाण्यात किंवा नदी पात्रात उतरण्यास मज्जाव करण्याची यंत्रणा कार्यरत नाही. पर्यटक खुलेआम पाण्यात उतरतात. आनंद घेण्याच्या नादात स्वतःचा जीव गमावतात. जलसंपदा विभागाने याकडे सुरक्षेच्या नजरेने पाहिले नसल्यामुळे सुरक्षा रक्षक तैनात नाहीत. धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावलेले नाहीत, तसेच नदी पात्रात किंवा सांडव्याजवळ पाण्यात उतरणाऱ्या हुल्लडबाजांवर अद्याप दंडात्मक कारवाई केली नसल्याने असे अनुचित प्रकार वारंवार घडत आहेत. तरीदेखील धोकादायक व दुर्घटनाग्रस्त ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अजून किती जीव गेल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग येणार आहे?

धरणाच्या पायथ्याला सांडव्याजवळ वारणा नदी पात्रात आत्तापर्यंत अक्षय पाटील, राहुल मगदूम, तुषार कुंभार, सुधीर कांबळे, करण कळंत्रे व परवा अभिषेक मंडले, या सहा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना वाचवण्यात ग्रामस्थांना किंवा इतर उपस्थित पर्यटकांना यश आले नाही.
चांदोली धरण व अभयारण्य महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. सुटीच्या दिवशी पर्यटक गर्दी करतात. मौजमजा करताना पर्यटकांचे मृत्यू होत आहेत. वारंवार घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिक व पर्यटकांतून बोलले जात आहे.


शनिवारी व रविवारी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा. पाटबंधारे विभागाने दुर्घटनाग्रस्त व धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावे. संरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपण करून याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. - वसंत पाटील, माजी सरपंच, मणदूर
 

शाहुवाडी तालुका हद्दीत नवीन पोलिस चौकीची इमारत बांधली आहे. तेथे वीज व पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांची गैरसोय होते. नवीन चौकीजवळ प्रतिबंधात्मक फलक लावले आहेत. लवकरच सुरक्षारक्षक नेमण्यात येईल. - गोरख पाटील, शाखा अभियंता, वारणा पाटबंधारे विभाग, वारणावती.

Web Title: Neglect of the administration towards the safety system of dangerous and accident-prone places in Chandoli Dam, Warna River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.