नेपाळ-भारत बहुभाषिक विश्व संमेलन दिमाखात संपन्न

By श्रीनिवास नागे | Published: February 24, 2023 03:18 PM2023-02-24T15:18:34+5:302023-02-24T15:19:58+5:30

हे संमेलन काठमांडू येथे भारतीय दूतावासाच्या हॉलमध्ये संपन्न झाले

Nepal-India Multilingual World Conference concluded | नेपाळ-भारत बहुभाषिक विश्व संमेलन दिमाखात संपन्न

नेपाळ-भारत बहुभाषिक विश्व संमेलन दिमाखात संपन्न

googlenewsNext

सांगली: भारतीय दूतावास नेपाळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा जि. सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू येथे २१ फेब्रुवारी २०२३ रोजी नेपाळ -भारत बहुभाषिक विश्वसंमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. यावेळी मराठी, नेपाळी, मैथिली, अवधी, संस्कृत, हिंदी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी, पंजाबी व इंग्रजी अशा १२ भाषेतील तीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे संमेलन काठमांडू येथे भारतीय दूतावासाच्या हॉलमध्ये संपन्न झाले. भारतीय दूतावासातील सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आसावरी बापट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी भूपाल राई, कुलपती नेपाळ प्रज्ञा प्रतिष्ठान, बिमल कृष्ण श्रेष्ठ, उप कुलपती नेपाळ प्रज्ञा प्रतिष्ठान व डाॅ . गंगाप्रसाद अकेला, ज्येष्ठ साहित्यिक होते. अध्यक्षस्थान त्रिभुवन विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख डाॅ .संजीता वर्मा यांनी भूषविले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी पाठवलेला शुभसंदेश सर्व रसिकांना चित्रफितीद्वारे दाखविण्यात आला. भाषेचे राष्ट्राच्या प्रगतीत खूप मोठे योगदान असते. भारत व नेपाळ यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक गहिरे करण्यासाठी सर्व साहित्यिक प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या डाॅ . स्वाती शिंदे पवार, अनिल पवार , प्रा. डॉ. प्रीती शिंदे-पाटील यांनी अक्षरयात्री प्रतिष्ठानचे हे रौप्य महोत्सवी संमेलन काठमांडू येथे साजरे करून एक नवे पाऊल टाकले आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्रातून दहा कवी व कवयित्री यांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक भाषेतील कवी कवयित्रींनी आपल्या दर्जेदार कविता यावेळी सादर केल्या. 

जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून संपन्न झालेल्या या साहित्य संमेलनाप्रमाणे मराठी भाषेचे साहित्यिक कार्यक्रम जगभर करण्याची भूमिका यावेळी डॉ .स्वाती शिंदे - पवार यांनी बोलून दाखविली. त्रिभुवन विद्यापीठ व संस्कृत विद्यापीठातील कुलपतींनी यावेळी मराठी साहित्यिकांना विद्यापीठांमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राजदूतावास नेपाळ आणि अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. ज्ञानेश्वर मुळे माजी राजदूत व डॉ. आसावरी बापट यांनी खूप परिश्रम घेतले.

या संमेलनामुळे भारत नेपाळ मैत्रीचा पूल बांधण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास दोन्ही देशातील साहित्यिकांनी व्यक्त केला. यावेळी प्रा. डॉ. विलास पाटील परभणी यांनी बहिणबाई, डॉ. उर्मिला चाकूरकर पैठण यांनी विठोबा, डॉ. ज्योती कदम नांदेड यांनी आदिम जाणीव, डॉ . शुभा लोंढे पुणे यांनी लगते है ही हिंदी ऊर्दू बहारदार गझल सादर करून भलतीच वाहवा मिळविली . आशा डांगे औरंगाबाद यांनी जत्रा, डॉ .स्वाती शिंदे -पवार यांनी साहित्यिक आहे मी एल्गार आहे ही कविता सादर केली. 

यावेळी त्रिभुवन विश्वविद्यालय, वाल्मिकी विद्यापीठ, नेपाळ संस्कृत विश्व विद्यालय, अक्षरयात्री प्रतिष्ठान भारत, स्वामी विवेकानंद संस्था नेपाळ, राजदूतावास नेपाळ यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. या साहित्य संमेलनास नेपाळमधील सर्व मान्यवर लेखकांनी आपली उपस्थिती लावली होती .

Web Title: Nepal-India Multilingual World Conference concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली