महाराष्ट्रात नव्या ४२ एक्स्प्रेसना थांबा, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 04:22 PM2023-08-23T16:22:21+5:302023-08-23T16:23:52+5:30

मध्य रेल्वेकडून नवे थांबे जाहीर : जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांमधून नाराजी

New 42 express stop in Maharashtra from Central Railway, But there is no stop in Sangli district | महाराष्ट्रात नव्या ४२ एक्स्प्रेसना थांबा, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना ठेंगा

महाराष्ट्रात नव्या ४२ एक्स्प्रेसना थांबा, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना ठेंगा

googlenewsNext

सांगली : मध्य रेल्वेने सोमवारी ४२ एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या अनेक रेल्वे स्टेशनवर थांबे जाहीर केले. मात्र सांगली जिल्ह्यात यातील एकाही गाडीला थांबा न दिल्याने जिल्ह्यातील प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सांगली जिल्हा हा व्यापार, उद्योगात संपूर्ण देशभरातील बाजारपेठांशी संपर्कात असताना त्यांचा वाहतूक व्यवस्थेतील संपर्क वृद्धिगंत करण्याऐवजी तो कमी करण्याचा प्रकार यानिमित्ताने दिसून आला. सांगली रेल्वे स्टेशन वरुन दिवसभर १५ तास बेळगाव, हुबळी, बेंगलोरकडे जाणारी एकही गाडी नाही. तसेच पुण्याच्या दिशेनेही सांगली रेल्वे स्टेशनवर सकाळी दहा ते एकच्या वेळेत जाणारी एकही गाडी नाही. दिल्लीला जाणाऱ्या सर्व गाड्या सांगली रेल्वे स्टेशनवरून चांगले उत्पन्न देत आहेत.

त्या अनुषंगाने चंडीगड-यशवंतपूर(बेंगलोर) संपर्क क्रांती व निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांती या दोनच गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मागितला गेला होता. किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर दादर-हुबळी एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस व मिरज-पुणे एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा मागितला गेला होता. सांगली व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनचे हे थांबे मंजूर करण्यात आले नाहीत. सांगली व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर वारंवार होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रवासी व प्रवासी संघटना संतप्त झाल्या आहेत.

अन्य जिल्ह्यात छोट्या स्टेशनवर ही थांबे

मध्य रेल्वेने नव्या ४२ गाड्यांना पुणे, सातारा सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, बुलढाणा रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यात अनेक छोट्या स्थानकावरही थांबे दिले आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील एकाही स्टेशनला थांबा मिळाला नाही.

पंढरपूर, सोलापूरला ही नाही गाडी

सांगली रेल्वे स्टेशन वरून पंढरपूर, सोलापूरला जाणारी ही कुठलीही गाडी नसल्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी समुदायाने ही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सांगली-पंढरपूर डेमू गाडीही सुरु करण्याची गरज आहे.

सांगली रेल्वे स्टेशनवर संपर्क क्रांती एक्सप्रेस व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर गोवा एक्स्प्रेस, दादर-हुबळी एक्स्प्रेस व मिरज-पुणे एक्स्प्रेसचा थांबा त्वरित मंजूर करावा, यासाठी खासदार संजय पाटील यांच्याशी संपर्क केला आहे. आम्ही थांबा मंजूर होण्यासाठी पूर्ण ताकद लावू. - उमेश शहा, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुप

Web Title: New 42 express stop in Maharashtra from Central Railway, But there is no stop in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.