सांगलीत आयर्विनलगतच होणार नवा पर्यायी पूल, पांजरपोळची जागा बदलली, आराखड्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:13 PM2017-12-20T12:13:17+5:302017-12-20T12:30:36+5:30
कृष्णा नदीवरील ९० वर्षांच्या ऐतिहासिक आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती दिली आहे. पांजरपोळसमोरून हा पूल जाणार होता. पण आता त्याची जागा बदलण्यात आली असून, आयर्विन पुलाजवळच १० मीटर अंतरावर नवा पूल उभारला जाणार आहे.
शीतल पाटील
सांगली : कृष्णा नदीवरील ९० वर्षांच्या ऐतिहासिक आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती दिली आहे. पांजरपोळसमोरून हा पूल जाणार होता. पण आता त्याची जागा बदलण्यात आली असून, आयर्विन पुलाजवळच १० मीटर अंतरावर नवा पूल उभारला जाणार आहे. या पुलाचा आराखडा तयार करण्याचे काम मुंबईतील डिझाईन सर्कल विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी हाती घेतले आहे.
सांगलीत १९१४ व १९१६ मध्ये कृष्णा नदीला महापूर आला होता. तत्कालीन सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन दुसरे यांनी येथे नदीवर पूल उभारण्यासाठी पुढाकार घेतला. १९२७ मध्ये पुलाचे काम सुरू झाले. दोन वर्षांनी म्हणजे १९२९ मध्ये या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले.
तत्कालीन व्हाईसरॉय आयर्विन यांच्याहस्ते या पुलाचे उद््घाटन करून पुलाला त्यांचेच नाव देण्यात आले. तेव्हापासून तब्बल ८६ वर्षे हा पूल सांगलीच्या प्रगतीचा साक्षीदार ठरला आहे. या पुलाची मुदत संपल्याने पर्यायी पुलाची मागणी होऊ लागली. काही वर्षांपूर्वी या पुलास पर्याय म्हणून बायपास रस्त्यावर पूल बांधण्यात आला. पण शहरापासून तो लांब असल्याने आयर्विनशेजारीच नव्या पुलाची मागणी होऊ लागली.
महाडमधील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे आयर्विन पुलाची कमजोरी आणि त्याला पर्यायी पुलाची गरज समोर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच जुन्या व नव्याने अस्तित्वात असलेल्या पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचे आदेश त्यावेळी दिले होते. त्यानुसार आयर्विन पुलाचेही आॅडिट झाले.
हा पूल अजूनही मजबूत असला तरी, त्याची कालमर्यादा संपली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यायी पुलाच्या मागणीला जोर आला. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावेळी हा मुद्दा लावून धरला. मुख्यमंत्री फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे त्याबाबत पाठपुरावा केला. अखेर राज्याच्या अर्थसंकल्पात नव्या पर्यायी पुलाच्या २५ कोटीच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवित यंदाच्या अंदाजपत्रकात दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
मेन रोड-कापडपेठमार्गे पांजरपोळसमोरून सांगलीवाडीतील चिंचेच्या बनापर्यंत हा पूल उभारण्याची चाचपणी करण्यात आली. दोन्ही बाजूला सरकारी जागा आहे. त्यामुळे जागा हस्तांतरणाचीही कोणतीच अडचण नाही. त्याजवळूनच टिळक चौकामार्गे महापालिकेकडे जाणारा मार्ग एकेरी आहे. मेन रोड-कापड पेठ रस्ताही एकेरी असल्याने वाहतुकीचा ताण कमीच राहील, असा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले होते.
त्यानुसार मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिझाईन सर्कल तज्ज्ञांनी पाहणीही केली होती. पण आता पांजरपोळसमोरून जाणाऱ्या पुलाची जागा बदलण्यात आली आहे. आर्यविन पुलाजवळूनच १० मीटर अंतर सोडून पर्यायी पूल उभारला जाणार आहे.
टिळक चौकातून आयर्विनशेजारून सांगलीवाडीपर्यंत हा पूल होईल. पुलाची उंची आयर्विनइतकीच असून लांबी २00 मीटर आहे. दोन्ही बाजूस ७.५ मीटर लांबीचा हा दुपदरी पूल होणार आहे. या पुलाच्या आराखड्याचे काम डिझाईन सर्कल विभागाचे अधीक्षक अभियंत्यांनी हाती घेतले आहे.