‘शिवशाही ते पेशवाई’तून नवा दृष्टिकोन

By admin | Published: February 19, 2017 11:13 PM2017-02-19T23:13:42+5:302017-02-19T23:13:42+5:30

अशोक राणा : प्राचार्य पी. बी. पाटील यांचे विचार पुस्तकरूपाने प्रकाशित

A new approach from Shivshahi to Peshwas | ‘शिवशाही ते पेशवाई’तून नवा दृष्टिकोन

‘शिवशाही ते पेशवाई’तून नवा दृष्टिकोन

Next



सांगली : ‘शिवशाही ते पेशवाई’ या पुस्तकातून प्राचार्य पी. बी. पाटील यांनी इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला आहे. या पुस्तकात कोठेही अभिनिवेश नाही. चुकीच्या इतिहासावर त्यांनी संयमाने संताप व्यक्त केला आहे. शिवचरित्राविषयी अनेक प्रकारचे समज-अपसमज प्रचलित असताना, हे पुस्तक भावी पिढीला मोलाचे मार्गदर्शक ठरेल, असे मत इतिहास संशोधक प्रा. डॉ. अशोक राणा यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले.
येथील मराठा समाज सभागृहात आयोजित ‘शिवशाही ते पेशवाई’ या विषयावरील व्याख्यानमालेत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी मांडलेले विचार त्यांच्या कन्या गीता पाटील यांच्या पुढाकाराने पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्यात आले. इतिहास संशोधक डॉ. अशोक राणा यांच्याहस्ते व ज्येष्ठ समाजसेवक परशुराम नंदीहळ्ळी (बेळगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी डॉ. राणा बोलत होते.
ते म्हणाले की, प्राचार्य पी. बी. पाटील चालते-बोलते विद्यापीठ होते. राजकारणात राहूनही त्यांनी दोषांना जवळ येऊ दिले नाही. ते आमदार होते, पण राजकारणी नव्हते. शिवशाही ते पेशवाईपर्यंतच्या इतिहासाला हात घालण्याचे धाडस त्यांनी केले. हा विषय तसा विस्फोटक. तरीही तो त्यांनी संयमाने हाताळला आहे. शिवशाहीचे स्वरूप व्यक्त करताना त्यांनी मांडलेले निष्कर्ष त्यांच्या न्यायबुद्धीचे द्योतक आहे. भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञानावर त्यांनी मांडलेली मते वाचकांच्या पारंपरिक धारणांना धक्के देणारी ठरतील, यात शंका नाही.
सध्या आठ ते दहा दिवसात शिवचरित्र लिहिणारे खूपजण आहेत. पण खरे शिवचरित्र समोर आणण्याचे धाडस मोजकेच लोक दाखवत आहेत. वास्तविक इंग्रजांनी भारताच्या इतिहासाला धार्मिक वळण दिले. त्यात ज्या बखरींचा संदर्भ घेत शिवचरित्र लिहिले गेले, त्या बखरी पूर्वग्रहदूषित होत्या. या बखरींमुळेच छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा विकृतरित्या उभी केली गेली. मराठेशाहीची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत केली. मराठ्यांनी इतिहास घडविला, पण तो लिहिला नाही. प्राचार्य पी. बी. पाटील यांनी इतिहास लेखनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन या पुस्तकातून दिला आहे. पुस्तकाच्या लिखाणात अनेक ठिकाणी त्यांचा संताप व्यक्त झाला आहे. पण तो संतापही त्यांनी संयमाने हाताळला आहे. आता या पुस्तकाची स्वतंत्र समीक्षा होण्याची गरज आहे, असेही डॉ. राणा म्हणाले.
परशुराम नंदीहळ्ळी म्हणाले की, प्राचार्य पी. बी. पाटील यांचा ध्येयवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात फिरत होता. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास निर्भीडपणे मांडण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. पी. बी. सर केवळ फर्डे वक्तेच नव्हते, तर ते शाहीरही होते. ते विचारवंत, राजकारणी होते, अंधश्रद्धाळू नव्हते.
प्रारंभी ग्रंथदिंडी काढून युद्धकलांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर शाहीर डॉ. राजीव चव्हाण व सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी स्वागत केले, तर प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या कन्या गीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. शालिनीताई पाटील यांच्या संदेशाचे वाचन अपर्णा खांडेकर यांनी केले. प्राचार्य पाटील लिखित महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली.
यावेळी प्राचार्य पाटील यांची नातवंडे पालखीचे वाहक बनली होती. शेवटी शिवाजी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. तारा भवाळकर, डॉ. अविनाश पाटील, ना. ह. माळी, प्रा. रामचंद्र घोडके, शेतकरी नेते अ‍ॅड. किसनराव येळूरकर (बेळगाव), महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपकराव दळवी (बेळगाव) उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पी. बी. सरांचे रेकॉर्ड कायम
परशुराम नंदीहळ्ळी यांनी प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. बेळगाव येथील वक्तृत्व स्पर्धेवेळी पहिल्यांदा त्यांची भेट झाली. त्यानंतर ते तीनवेळा बेळगावात वक्तृत्व स्पर्धेसाठी आले. तिन्हीवेळी त्यांनी पहिला क्रमांक पटकाविला. हा विक्रम आजही अबाधित आहे. सीमालढ्यावेळी त्यांनी खानापूर, येळ्ळूर येथे व्याख्यान दिले होते. त्यांच्या व्याख्यानामुळे स्फुरण येऊन तरूणांनी पहिल्यांदा सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला होता, असेही ते म्हणाले.

Web Title: A new approach from Shivshahi to Peshwas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.