आयर्विनच्या शेजारी होणार नवा पूल

By Admin | Published: March 18, 2017 11:57 PM2017-03-18T23:57:53+5:302017-03-18T23:57:53+5:30

अंदाजपत्रकात तरतूद : २५ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी; याचवर्षी होणार प्रारंभ : सुधीर गाड

New bridge will be next to Irwin | आयर्विनच्या शेजारी होणार नवा पूल

आयर्विनच्या शेजारी होणार नवा पूल

googlenewsNext

सांगली : आयर्विन पुलाला त्याच्या शेजारीच पर्यायी पूल उभारण्यासाठी राज्य शासनाने शनिवारी मंजुरी दिली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २५ कोटींच्या या प्रकल्पाला हिरवा कंदील दर्शवितानाच चालू अंदाजपत्रकात दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे याच वर्षात कामास सुरुवात होणार आहे.
महाडमधील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेने आयर्विन पुलाच्या दुरवस्थेची आणि पर्यायी पुलाची गरज समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वच जुन्या व नव्याने अस्तित्वात असलेल्या पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचे आदेश दिले होते. त्यानुसार आयर्विन पुलाचेही आॅडिट झाले. हा पूल अजूनही मजबूत असला तरी, त्याची कालमर्यादा संपली आहे. त्यामुळे यापूर्वीच याला पर्यायी बायपास पूल बांधण्यात आला, मात्र तो खूप लांब असल्याने आयर्विन पुलाच्या शेजारीच पर्यायी पूल उभा राहिला पाहिजे, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यासाठीचा रितसर तांत्रिक प्रस्तावही तयार केला होता. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला.
शनिवारी अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी गाडगीळ यांनी आयर्विनच्या पर्यायी पुलाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली होती. ऐनवेळी या पुलाच्या प्रकल्पाचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला.
पुणे, मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुलांना शेजारीच नव्याने पर्यायी पूल उभारण्यात आले आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यानुसार आता हा नवा पर्यायी पूल होणार आहे. कोल्हापूर रस्त्याने आलेल्या शंभरफुटीमार्गे लोखंडी पुलाजवळून पर्यायी सांगलीवाडीमार्गे पयार्यी पूल होऊ करण्याचाही प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठीही आता पाठपुरावा सुरू आहे. (प्रतिनिधी)


मेन रोड-कापडपेठ मार्गे जाणारा रस्ता सर्वाधिक सोयीचा ठरणार आहे. हा मार्ग पुढे गणपती मंदिराच्या शेजारून स्वामी समर्थ घाटाच्या डाव्या बाजूने पुढे जाणार आहे. तेथून सांगलीवाडीतील चिंचेच्या बनापर्यंत पूल उभारला जाणार आहे. दोन्ही बाजूला सरकारी जागा आहे. त्यामुळे जागा हस्तांतरणाचीही कोणतीच अडचण नाही. जवळूनच महापालिकेमार्गे टिळक चौकाकडे जाणारा मार्ग एकेरी आहे. त्यामुळे मेन रोड-कापड पेठ रस्ताही एकेरी असल्याने वाहतुकीचा ताण कमीच राहील.



आयर्विनएवढीच उंची
नवीन पुलाची लांबी २00 मीटर आहे. दोन्ही बाजूस ७.५ मीटर लांबीचा हा दुपदरी पूल होणार असून त्याची उंची आयर्विन पुलाएवढीच राहणार आहे. २५ कोटी रुपयांचा एकूण प्रकल्प असून २ कोटी रुपये २0१७-१८ या वर्षाकरिता मिळणार आहेत. याच वर्षात या पुलाच्या कामास सुरुवात होईल.

आयर्विन पुलाला असणारा सध्याचा पर्यायी पूल शहरापासून दूर आहे. आयर्विनवरील अवजड वाहतूक बंद झाल्यामुळे येथील नागरिकांना व शहरात ये-जा करणाऱ्या लोकांच्या अडचणीत वाढ झाली. बसेससह अन्य वाहतुकीच्या साधनांचा खर्च लोकांना परवडत नाही. त्यामुळे आयर्विनच्या जवळच पर्यायी पूल उभारणे गरजेचे होते. यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.
- आ. सुधीर गाडगीळ

Web Title: New bridge will be next to Irwin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.