मंताडा राजा दयानिधी सांगलीचे नवे जिल्हाधिकारी, अभिजित चौधरींची औरंगाबादला बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 05:00 PM2022-07-23T17:00:44+5:302022-07-23T17:01:10+5:30

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर बदलीला स्थगिती देण्यात आली होती. पुन्हा नव्याने बदलीचे आदेश देण्यात आले.

New Collector of Mantada Raja Dayanidhi Sangli, Abhijit Chaudhary transferred to Aurangabad | मंताडा राजा दयानिधी सांगलीचे नवे जिल्हाधिकारी, अभिजित चौधरींची औरंगाबादला बदली

मंताडा राजा दयानिधी सांगलीचे नवे जिल्हाधिकारी, अभिजित चौधरींची औरंगाबादला बदली

googlenewsNext

सांगली : जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. मंताडा राजा दयानिधी यांची शुक्रवारी शासनाने नियुक्ती केली. सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. गेल्या महिन्यात डॉ. चौधरी यांची बदली झाली होती. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर या बदलीला स्थगिती देण्यात आली होती. शुक्रवारी पुन्हा नव्याने बदलीचे आदेश देण्यात आले.

सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारणारे डॉ. मंताडा राजा दयानिधी मूळचे तेलंगणाचे असून त्यांचे शिक्षण एमबीबीएस झाले आहे. ते २०१४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नाशिक जिल्ह्यातून त्यांनी सेवेस प्रारंभ केला, त्यानंतर ते चंद्रपूर येथे आदिवासी कल्याण विभागात कार्यरत होते. तेथून गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. गोंदिया येथून त्यांची उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केल्यानंतर आता ते सांगली जिल्ह्याची सूत्रे स्वीकारणार आहेत.

सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांची याच पदावर बदली झाली होती.

२०१९ मध्ये डॉ. चौधरी यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. सूत्रे स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच महापुरावेळी त्यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यानंतरच्या महापूर आणि कोरोना कालावधीतही त्यांच्या कामाची सर्वत्र प्रशंसा झाली होती. स्वत: डॉक्टर असल्याने कोरोना कालावधीत त्यांनी रुग्णांवरील उपचारांचे चांगले नियोजन केले होते, त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा व रुग्णांना बेड मिळण्याबाबत जिल्ह्यात कोणतीही अडचण आली नव्हती. स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे त्यांनी तीन वर्षांहून अधिक काळ जिल्ह्यात काम केले.

डॉ. चौधरी यांना पुन्हा औरंगाबादच

गेल्या महिन्यात महाविकास आघाडी सरकारने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबादला आयुक्तपदी बदली केली होती, तर सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती केली होती. मात्र, नव्या शिंदे सरकारने या बदलीस स्थगिती दिली होती. आता पुन्हा चौधरी यांना औरंगाबाद येथेच नियुक्ती देण्यात आली आहे.

लवकरच सूत्रे स्वीकारणार

बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. कोरोना कालावधीत उल्हासनगर महापालिकेची सूत्रे स्वीकारली होती. लवकरच जिल्ह्याची सूत्रे स्वीकारणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. मंताडा राजा दयानिधी यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

Web Title: New Collector of Mantada Raja Dayanidhi Sangli, Abhijit Chaudhary transferred to Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.