Maharashtra Vidhan Sabha 2019 : घराणेशाहीबरोबर यंदा नवे चेहरेही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 03:52 PM2019-10-09T15:52:24+5:302019-10-09T15:54:51+5:30
सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आजवर वेगवेगळ्या घराण्यांनी आपले वर्चस्व राखत लोकांवरील प्रभाव कायम राखला. जिल्ह्याच्या गेल्या ५९ वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे होत गेल्यानंतर घराणेशाहीबरोबर नव्या चेहऱ्यांनीही राजकीय पटलावर आपले अस्तित्व निर्माण केले. यंदाच्या निवडणुकीत घराणेशाही आणि नव्या चेहऱ्यांचा संमिश्र पट दिसून येत आहे.
अविनाश कोळी
सांगली : जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आजवर वेगवेगळ्या घराण्यांनी आपले वर्चस्व राखत लोकांवरील प्रभाव कायम राखला. जिल्ह्याच्या गेल्या ५९ वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे होत गेल्यानंतर घराणेशाहीबरोबर नव्या चेहऱ्यांनीही राजकीय पटलावर आपले अस्तित्व निर्माण केले. यंदाच्या निवडणुकीत घराणेशाही आणि नव्या चेहऱ्यांचा संमिश्र पट दिसून येत आहे.
जिल्ह्याच्या आठही मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. आघाडी आणि महायुती असा सामना रंगणार आहे. या दोन्ही प्रमुख पक्षांचा विचार केल्यास दोन्हीकडेही घराणेशाही आणि नव्या चेहऱ्यांचे संमिश्र चित्र दिसून येते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप व शिवसेनेने जिल्ह्यातील घराणेशाहीवर प्रचंड टीका केली होती.
भाजप आणि शिवसेना सत्तास्थानी आल्यानंतर त्यांनीही या घराणेशाहीचा पुरस्कार केल्याचे दिसत आहे. घराणेशाहीचा पुरस्कार करताना त्यांचा त्या मतदारसंघातील प्रभाव विचारात घेतला जात आहे. संबंधित घराण्यांनीही लोकांवरील आपला प्रभाव कायम राखण्यात यश मिळविले आहे. त्यामुळेच ही अपरिहार्यता भाजप व शिवसेनेनेही स्वीकारली.
घराणेशाहीचा पुरस्कार सर्वच पक्षाकडून केला जात असताना, नव्या चेहऱ्यांनाही पसंती देण्याची नवी परंपराही त्यास जोडली जात आहे. गेल्या काही निवडणुकांत अनेक नवे चेहरे जिल्ह्याने निवडले आणि राज्याच्या राजकारणात त्यांना काम करण्याची संधी दिली.
यंदाच्या निवडणुकीतही अशा नवीन चेहऱ्यांचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राजकारणात कोणताही वारसा नसलेले अनेक चेहरे प्रमुख पक्षांकडून इच्छुक म्हणून पुढे येत आहेत. यातील काहींना संधी मिळाली, तर काहींना अद्याप संधी मिळालेली नाही.