हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी आली नवी यंत्रे; ट्रक माऊंट फॉग वॉटर कॅनॉन यंत्राची सांगलीत चाचणी
By अविनाश कोळी | Published: December 13, 2023 06:50 PM2023-12-13T18:50:41+5:302023-12-13T18:50:59+5:30
हवेतील प्रदूषण हा जागतिक स्तरावर सर्वात चिंतेचा विषय बनला आहे. मोठ्या
सांगली: हवेतील प्रदूषण हा जागतिक स्तरावर सर्वात चिंतेचा विषय बनला आहे. मोठ्या शहरांप्रमाणे आता छोट्या शहरांमध्येही प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात आयुक्तांनी प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सांगलीत ट्रक माऊंट फाॅग मिस्ट कॅनॉन यंत्र दाखल झाले असून त्याची चाचणी बुधवारी महापालिकेने घेतली.
महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानाअंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध योजना रबिवल्या जात आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिकेने हवेतील प्रदूषण कमी करण्याकरिता दोन ट्रक माऊंट फॉग मिस्ट वॉटर कॅनॉन यंत्रे खरेदी केलेली आहेत. या यंत्रांमुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
सांगलीत घेतली चाचणी
या यंत्राची सांगलीत चाचणी घेण्यात आली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, सुनील पाटील आदी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक पाहून समाधान व्यक्त केले.
असे काम करते यंत्र
या यंत्राद्वारे जास्त दाबाने पाणी फवारणी केली जाते. जेणेकरून हवेतील धुलिकण पाण्याच्या संपर्कात येऊन खाली येतात. यामुळे वायू प्रदूषण रोखता येते. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदूषणावर आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही सुरू केली आहे.