‘संस्थापक’च्या नूतन मोहिते संपर्क दाैऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:37+5:302021-06-24T04:18:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या उभारणीत रेठरे बुद्रुक येथील आबासाहेब मोहिते यांचाही मोठा वाटा आहे. २०१० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या उभारणीत रेठरे बुद्रुक येथील आबासाहेब मोहिते यांचाही मोठा वाटा आहे. २०१० च्या निवडणुकीत आबासाहेब मोहिते यांच्या पत्नी नूतन मोहिते पुत्र अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनलच्या माध्यमातून कारखान्याच्या निवडणुकीत उतरल्या. सध्या त्यांचे वय वर्षे ६३ असून, प्रचारासाठी न थकता फिरत आहेत.
१९८९पासून प्रत्येक निवडणुकीत मोहिते-भोसले संघर्ष दिसला. २०१०च्या निवडणुकीत ज्येष्ठ कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करून संस्थापक पॅनल पुढे आणले. यामध्ये आबासाहेब मोहिते यांच्या पत्नी नूतन मोहिते आघाडीवर होत्या. त्यांनी अविनाश मोहिते यांचे नेतृत्व पुढे आणले आणि सभासदांनी त्यांना कौल दिला. अविनाश मोहिते अध्यक्ष झाले. मोहिते यांच्या पाच वर्षांच्या कालावधीत कृष्णा अडचणीत आल्याचा आरोप ठेवण्यात आला. २०१५च्या तिरंगी निवडणुकीत सहकार पॅनल यशस्वी झाले आणि डॉ. सुरेश भोसले अध्यक्ष झाले. त्यांच्या संचालक मंडळाने मागील पाच वर्षातील कारभाराचा लेखाजोखा चव्हाट्यावर मांडला आणि अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलपुढे अडचणी निर्माण केल्या. यातून मार्ग काढून मोहिते सक्रिय झाले आहेत. सध्या त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या मातोश्री नूतन मोहिते यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. आतापर्यंत कारखाना कार्यक्षेत्रातील २९ गावांना भेटी देऊन प्रत्येक घरात संपर्क साधला आहे. मतदानाला एक आठवडा बाकी आहे. त्या कालवधीत उर्वरित गावांत संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
तिसऱ्यांदा धुरा सांभाळली
नूतन मोहिते यांचे माहेर कर्नाटकातील. माहेरी शेतीचा वारसा. लग्नानंतर रेठरे बुद्रुक येथील आबासाहेब मोहिते यांच्या घरात त्या आल्या. त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून दहावीपर्यंत झाले आहे. त्यांनी तिसऱ्यांदा संस्थापक पॅनलची धुरा सांभाळली आहे.