सांगली भाजपमध्ये पुन्हा नव्या-जुन्यांचा वाद
By अविनाश कोळी | Published: September 24, 2022 09:11 PM2022-09-24T21:11:55+5:302022-09-24T21:12:26+5:30
निष्ठावंतांच्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीची मागणी
सांगली: जिल्हा भाजपची ग्रामीण कार्यकारणी बरखास्त करुन त्यावर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील निष्ठावंत भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केली. शनिवारी सांगलीतील एका हॉटेलमध्ये निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांसह माजी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
माजी पदाधिकारी म्हणाले की, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन आम्ही भाजपची धुरा सांभाळली. त्यामुळेच भाजपाला सध्या वैभव प्राप्त झाले आहे. हे यश पाहून इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. या लोकांच्या गर्दीत भाजपाचा मूळ निष्ठावंत कार्यकर्ता प्रवाहातून बाहेर ढकलला जातोय, अशी खंत व्यक्त करण्यात आली.
या निष्ठावंतांच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा लाभ पक्षाने घेण्यासाठी या सर्व निष्ठावंतांना योग्य स्थानावर बसविले पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत जुन्या कार्यकर्त्यांनाही प्रवाहात घ्यावे व नवीन पदाधिकाऱ्यांकडून त्यांना सन्मान देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.