सांगलीत रक्तदानाचा नवा विक्रम
By admin | Published: July 9, 2014 12:38 AM2014-07-09T00:38:50+5:302014-07-09T00:39:11+5:30
उत्स्फूर्त प्रतिसाद : १ हजार ५४७ लोकांनी केले रक्तदान
सांगली : ‘चला रक्तदान करुया, प्रेमाची नाती जोडूया’, असे आवाहन करीत राबविण्यात आलेल्या रक्तदान महाअभियानास सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सांगलीतील यापूर्वीचा एकादिवशीचा पावणेपाचशे बाटल्या रक्तदानाचा विक्रम मोडीत काढून श्रीनिवास पाटील मित्रमंडळाने दीड हजार रक्तबाटल्यांचा नवा विक्रम केला. शहरातील सर्व रक्तपेढ्यांनी यात सहभाग घेतला होता.
सांगली जिल्ह्यात दररोज २५० आणि वर्षाकाठी ९० हजार रक्तपिशव्यांचा तुटवडा जाणवत आहे. रक्तपेढ्यांनी दिलेल्या या माहितीची दखल घेऊन मंडळाने हा उपक्रम हाती घेतला. सांगलीच्या राजमती भवनात हा कार्यक्रम पार पडला. सकाळी ९ वाजल्यापासून रक्तदात्यांनी गर्दी केली होती. दिवसभरात १ हजार ५४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाअभियानाचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. ते म्हणाले की, जिल्ह्यातील दैनंदिन व वार्षिक रक्ताच्या मागणीचे आकडे पाहिल्यानंतर रक्तदानाची किती गरज आहे, याची कल्पना येते. पुण्यातील राम बांगड यांनी रक्तचळवळीत केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. सामाजिक उपक्रमांनी सांगलीची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न अशा उपक्रमातून होत आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, रक्तदानासाठी सांगलीकरांना आवाहन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली, तेव्हा माझ्यावर एक दडपण आले. मी कधीही रक्तदान केले नव्हते. त्यामुळे मी स्वत: रक्तदानाचा निर्णय घेतला. आयुष्यातील पहिले रक्तदान मी सांगलीत केले, या गोष्टीचा अभिमान वाटतो. चांगल्या गोष्टींसाठी लोकांना आवाहन केले, तर लोक त्याला भरभरून प्रतिसाद देतात, याची प्रचिती या अभियानातून आल्याचे मत श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. स्वागत डॉ. शुभांगी पाटील यांनी, सूत्रसंचालन सुमेधा कुंभोजकर-दातार यांनी केले.
यावेळी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, रक्ताची नाती संस्थेचे अध्यक्ष राम बांगड, नगसेवक संजय बजाज, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, नगरसेविका अंजना कुंडले, सुभाष पाटील, मनोज शिंदे, प्रा. पद्माकर जगदाळे, धनंजय कुंडले, हरिदास पाटील, नालसाहब मुल्ला आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)