नवीन पोलिस अधीक्षक कार्यालयात आजपासून कामकाज; उदघाटन होणार यथावकाश
By संतोष भिसे | Published: December 3, 2023 06:45 PM2023-12-03T18:45:08+5:302023-12-03T18:45:24+5:30
सांगलीच्या वास्तू वैभवात भर घालणारी नुतन पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत पूर्ण होऊन चार महिने झाल्यानंतर अखेर कामकाजाला मुहूर्त सापडला आहे.
सांगली : सांगलीच्या वास्तू वैभवात भर घालणारी नुतन पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत पूर्ण होऊन चार महिने झाल्यानंतर अखेर कामकाजाला मुहूर्त सापडला आहे. आज, सोमवारपासून पोलिस अधीक्षक कार्यालयात कामकाज सुरू होणार आहे. इमारत पूर्ण होऊनही उदघाटनाअभावी स्थलांतर थांबले होते. अखेर उदघाटन नंतर करू आता कामकाज सुरू करा, असे निर्देश शासनातर्फे देण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या गुरूवारपर्यंत सर्व कामकाज नवीन इमारतीमधूनच सुरू होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षक कार्यालयाचे काम पूर्ण होऊनही केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उदघाटन रखडल्याने इमारत धूळखात पडली होती. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठवला होता.
जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर विश्रामबागला १९६७ मध्ये सध्याचे पोलिस मुख्यालय उभारण्यात आले होते. आतापर्यंत इमारत जीर्ण झाल्याने व पोलिस दलाचाही विस्तार झाल्याने नवीन इमारतीची मागणी होत होती. त्यानुसार या इमारतीचे काम सुरू करण्यात आले. ठेकेदारानेही दिलेल्या निर्धारीत वेळेत काम पूर्ण करून दिले होते. सांगली शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाची इमारतीमुळे प्रशासकीय वैभवात भर पडली होती. मात्र, इमारत पूर्ण होऊनही त्यातून कामकाज होत नव्हते. जिल्ह्यातील इतर विकासकामांसह या इमारतीचेही उदघाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, तीनवेळा ठरलेला मुहूर्त लांबणीवर पडला होता. अखेर गृह विभागाने कामकाज सुरू करावे उदघाटनाबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल असे प्रशासनाला कळवले होते. त्यानुसार शुक्रवारपासून जून्या इमारतीमधील सर्व विभाग स्थलांतरी करण्यात येत होते. सोमवारपासून सर्व काम सुरू होईल. काही विभागाचे दप्तर येण्यास विलंब लागणार असल्याने गुरूवारपासून पूर्ण कामकाज नवीन इमारतीमधून होणार आहे.
चौकट
‘लोकमत’चा पाठपुरावा
इमारत पूर्ण होऊनही केवळ नेत्यांच्या तारखा मिळत नसल्याने देखण्या इमारतीचे उदघाटन रखडले होते. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला होता. सामाजिक संघटनांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अखेर गृह विभागानेच उदघाटन नंतर होईल कामकाज सुरू करा असे निर्देश दिले आहेत.