वसंतपंचमीच्या मुहूर्तावर नवीन हळदीच्या सौद्याला प्रारंभ, राजापुरी हळदीला मिळाला 'इतका' भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 05:03 PM2022-02-05T17:03:32+5:302022-02-05T17:04:09+5:30
पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी
सांगली : सांगली मार्केट यार्डात शनिवारी नवीन हळदीच्या सौद्यास प्रारंभ झाला. पहिल्याच सौद्यामध्ये राजापुरी हळदीला प्रति क्विंटल २२ हजार तर हालक्या प्रतिच्या हळदीला प्रति क्विंटल १२ हजार रुपये दर मिळाला आहे. पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी असून, भविष्यातही दर तेजीत असेल, असा व्यापाऱ्यांनी अंदाज वर्तविला आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या हस्ते हळदीचा सौदा काढण्यात आला. यावेळी सांगली बाजार समिती सभापती दिनकर पाटील, सचिव महेश चव्हाण यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
हळद सौद्यामध्ये बावची ता. वाळवा येथील शेतकरी अमोल पाटील यांच्या राजापुरी हळदीला प्रति क्विंटल २२ हजार रुपयांचा उचांकी दर मिळाला आहे. सदरची हळद मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केली आहे. सदरच्या हळद सौद्यामध्ये कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त २२ हजार) व सरासरी दर १२ हजार इतका मिळाला आहे. सदर सौद्यामध्ये ३९५६ पोती नवीन स्थानिक हळदीची आवक झाली.
हळदीचा प्रकार आणि आजअखेर आवक (क्विंटल)
राजापुरी : ८५०५३४ चोरा : १०९९
परपेठ : १३६०६३
वसंतपंचमीच्या मुहूर्तावर शनिवारी नवीन हळदीच्या सौद्याला प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच सौद्यामध्ये उच्चांकी प्रति क्विंटल २२ हजार रुपये दर मिळाला आहे. तसेच कमीत कमी क्विंटलला १२ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. कोरोनामुळे हळदीला मागणी वाढली असून दर तेजीत कायम असणार आहे. -दिनकर पाटील, सभापती, सांगली बाजार समिती.