मुहूर्ताच्या सौद्यात हळदीला झळाळी, सांगलीत क्विंटलला 'इतका' तर राजापुरीला उच्चांकी दर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 04:57 PM2023-02-01T16:57:46+5:302023-02-01T16:58:04+5:30
पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी
सांगली : सांगली मार्केट यार्डात मंगळवारी नवीन हळदीच्या सौद्यास प्रारंभ झाला. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये ८६२ पोती राजापुरी हळदीची आवक झाली असून प्रति क्विंटल १० हजार १०० रुपये ते सात हजार ५०० रुपये दर मिळाला आहे. पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी असून, भविष्यातही दर तेजीत असेल, असा व्यापाऱ्यांनी अंदाज वर्तविला आहे.
जिल्हा उपनिबंधक महेश सुरवसे व सचिव महेश चव्हाण यांच्या हस्ते हळदीचा सौदा काढण्यात आला. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, अडत संघटनेचे अध्यक्ष अमर देसाई, हळद खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष सतीश पटेल, गोपाळ मर्दा, मनोहर सारडा, सत्यनारायण अटल, मधुकर काबरा, अभय मगदूम, एन. बी. पाटील आदी उपस्थित होते.
हळद सौद्यामध्ये पेड ता. तासगाव येथील शेतकरी विनोद शेंडगे यांच्या राजापुरी हळदीला प्रति क्विंटल १० हजार १०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. या हळद सौद्यामध्ये कमीत कमी सात हजार ५०० ते जास्तीत जास्त १० हजार १०० व सरासरी पाच हजार रुपये दर मिळाला आहे. या सौद्यामध्ये ८६२ पोती नवीन स्थानिक हळदीची आवक झाली.
हळदीसह अन्य शेतीमालाचे दर पडले तर शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीची गडबड करू नये. शेतकऱ्यांना पैशाची गरज असेल तर बाजार समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज देण्याची सोय आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. -महेश चव्हाण, सचिव, सांगली बाजार समिती.