नवीन जलशुध्दीकरण केंद्र होणार
By admin | Published: December 4, 2014 11:30 PM2014-12-04T23:30:18+5:302014-12-04T23:42:03+5:30
गॅस्ट्रोचे आणखी दोन रुग्ण : हॉटेलमधील पाण्याची तपासणी सुरू
सांगली/मिरज : मिरजेत गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने आज दोन नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. गॅस्ट्रोची साथ पूर्णपणे नियंत्रणात असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाने हॉटेलमधील पाण्याची तपासणी सुरू केली आहे. दूषित पाण्याचा पुरवठा होऊ नये यासाठी नवीन जलशुध्दीकरण केंद्र कार्यन्वित करण्यात येणार आहे. फिरत्या पथकाव्दारे अतिसाराच्या रुग्णांवर उपचार सुरूच असल्याचे सांगण्यात आले.
शासकीय रुग्णालयात आज दोन अतिसाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात विविध ठिकाणी सर्वेक्षण करून अतिसाराची लक्षणे असलेल्या रुग्णांवर फिरत्या पथकाव्दारे उपचार करण्यात येत आहेत. दूषित पाण्याच्या तक्रारींमुळे शहरातील हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे पाण्याचे नमुने तपासण्यात येत असून, दूषित पाणी आढळलेल्या हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पाणी पुरवठा विभागाकडून पंधरा ठिकाणी जुन्या जलवाहिन्यांवरील पाणी जोडण्या नवीन जलवाहिनीवर जोडण्यात आल्या आहेत. शहरात गॅस्ट्रोची साथ नियंत्रणात आली असली तरी, सर्वेक्षण व फिरत्या पथकाव्दारे उपचार सुरूच राहणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले.
दरम्यान, पालिकेने तीनही शहरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. पाणी व ड्रेनेज पाईपलाईनची गळती काढणे, जुन्या पाईप बदलणे, ड्रेनेज प्रवाहित करणे, गाळ काढणे आदी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जलनिस्सारण विभागाने आज मिरजेतील १५ नळकनेक्शन नवीन पाईपलाईनवर स्थलांतर केली. तर तीन ठिकाणच्या पाईप बदलण्यात आल्या. शहरात अठरा ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, पाच ठिकाणची नळ गळती दुरुस्त करण्यात आली.
मिरज शहरात विशेष जनजागृती व औषधोपचार मोहीम राबविण्यात आली असून, घरोघरी सर्व्हेक्षण सुरूच आहे. क्षार संजीवनीची ८५ पाकिटे व १२७८ मेडिक्लोरचे वाटप करण्यात आले आहे. गॅस्ट्रोच्या पार्श्वभूमीवर हातगाडी व फेरीवाल्यांवरील बंदी अजूनही कायम आहे. दरम्यान फेरीवाल्याने आपल्याला व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)3.
५अद्याप २५ रुग्णांवर उपचार सुरू
सांगली व मिरजेतील गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आली आहे. आज गुरुवारी मिरजेत एक व सांगलीत तीन असे चार रुग्ण आढळून आले, तर खासगी रुग्णालयात एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही. आजअखेर मिरजेत १२ व सांगली १३ असा एकूण २५ जणांवर उपचार सुरू आहेत.