नव्या वर्षातही फुलांच्या घटत्या दराने उत्पादकांवर संक्रांत

By admin | Published: January 22, 2017 11:40 PM2017-01-22T23:40:29+5:302017-01-22T23:40:29+5:30

लग्नसराईतही अपेक्षाभंग : मिरजेच्या फूल बाजारात मागणी घटली, शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा ‘व्हेलेंटाईन डे’ची

In the new year, the producers' | नव्या वर्षातही फुलांच्या घटत्या दराने उत्पादकांवर संक्रांत

नव्या वर्षातही फुलांच्या घटत्या दराने उत्पादकांवर संक्रांत

Next



सदानंद औंधे ल्ल मिरज
गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत कोसळणाऱ्या दराने फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. फूलबागा फुलवूनही दर नसल्याने कोमेजून गेलेल्या शेतकऱ्यांवर नव्या वर्षात लग्नसराई सुरू झाल्यानंतरही फुलांचे दर घटल्याने संक्रांत आली आहे.
संक्रांत व लग्नसराई सुरू झाल्यानंतरही फुलांचे दर घटल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. फुलांचे दर निम्म्यावर आल्याने शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. मागणी व दर नसल्याने मिरजेच्या बाजारात फुलांची आवक घटली आहे. यावर्षी फुलांचे उत्पादन व बाजारात आवक मोठी असल्याने गणेशोत्सवातही फुलांचे दर वाढले नाहीत. गणेशोत्सव व दसरा, दिवाळीत झेंडूचा दर ५० रुपयांपर्यंत जात असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात झेंडूची लागवड केली होती. मात्र दरवाढीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची गणेशोत्सव, दसरा व दिवाळीत झेंडूला १० रुपयापेक्षा कमी दर मिळाल्याने निराशा झाली.
झेंडूला दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी झेंडू शेतातून काढून टाकल्याने झेंडूच्या क्षेत्रात घट झाली आहे. झेंडूची आवक कमी झाली तरीही दर दहा रुपयाच्या वर गेलेला नाही. फुलांना मागणी नसल्याने मिरजेतील बाजारातून होणाऱ्या फुलांच्या निर्यातीत घट झाली आहे. फुलांच्या बाजारात निशिगंध, झेंडू, गलांडा, लिली, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील फुलांचीही आवक असल्याचे शेतकरी दीपक कोरे यांनी सांगितले. निशिगंध व गुलाबाचे दरही कमी झाले आहेत. निशिगंधचा ३०० रुपयावरून १०० रुपयावर, तर गुलाबाचा दर प्रती शेकडा ३०० रुपयांवरून २०० रुपयांवर आला आहे. मार्गशीर्ष व संक्रांतीतही फुलांना दर मिळाला नाही. आता लग्नसराईस प्रारंभ झाल्यानंतरही फुलांना मागणी नाही. व्हॅलेंटाईन डे साठी हरितगृहातील गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी फुलांना मागणी येत असल्याने फुलांना दरासाठी व्हेलेंटाईन डे ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

धास्ती कायम
नोटाबंदीनंतर बाजारात भाज्यांसह सर्वच शेतीमालाचे दर गडगडले आहेत. त्यामुळे यावर्षी व्हॅलेंटाईन डे नेहमीप्रमाणे साजरा होणार का? याबाबत साशंकता असल्याने, हरितगृहात फुलांचे उत्पादन घेणारे शेतकरी धास्तावले आहेत. व्हॅलेंटाईन डेसाठी मिरजेतून मुंबई, दिल्ली, बेंगलोर या मोठ्या शहरात रेल्वेने फुलांची निर्यात होते. व्हॅलेंटाईन डेसाठी जानेवारीअखेरपासूनच फुलांच्या निर्यातीस सुरूवात होते. हरितगृहातील फुलांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचीही चांगली कमाई होते. मात्र यावर्षी व्हॅलेंटाईन डे साठी फुलांना मागणी कमी असल्याने शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
फुले टिकत नसल्याने पंचाईत

Web Title: In the new year, the producers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.