नवअभियंत्यांनो, शहराच्या समस्यांची उत्तरे शोधा
By admin | Published: May 26, 2017 11:07 PM2017-05-26T23:07:21+5:302017-05-26T23:07:21+5:30
नवअभियंत्यांनो, शहराच्या समस्यांची उत्तरे शोधा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे स्थलांतर वाढले आहे. शहरांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यात शहराच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याने या समस्या बिकट होत आहेत. त्यामुळे नव्या अभियंत्यांसमोर शहरातील समस्यांची उत्तरे शोधण्याचे आव्हान असल्याचे मत वालचंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी शुक्रवारी केले.
येथील वालचंद महाविद्यालयाच्या सातव्या पदवीदान समारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर एमटीईचे नूतन अध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्राचार्य जी. व्ही. परीशवाड उपस्थित होते.
अजित गुलाबचंद म्हणाले की, जगाच्या रचनेत वेगाने बदल घडत आहेत. आजच्याइतके समृध्द आणि अस्थिर वातावरण कधीच नव्हते. त्यामुळे नवअभियंत्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी विस्तीर्ण आकाश खुले आहे. भविष्याचा वेध घेतल्यास दहा वर्षाच्या कालावधित लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. मात्र जो गुणवत्ता दाखवेल त्याचाच निभाव लागेल, अशी स्थिती असेल.
खेड्यातून शहराकडे येणाऱ्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. खेड्यांच्या नयनरम्य कल्पनेत रममाण झाल्यामुळे शहराच्या विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. या वास्तवाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. नवअभियंत्यांसमोर शहराच्या विकासाचे आव्हान आहे, ते त्यांनी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलले पाहिजे, असे ते म्हणाले.
देवानंद शिंदे म्हणाले की, एक जबाबदार अभियंता म्हणून प्रत्येकाने आपली ओळख निर्माण करावी. कल्पकतेला संधी देऊन नवनवीन उपक्रम राबविण्यास पुढाकार घेतला, तर ती देशसेवाच ठरणार आहे. जीवनात यश, अपयशाचे डोंगर नेहमीच सर करावे लागतात. तुमचे कौशल्य दाखविण्यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध असून, त्याचा अभियंत्यांनी संधी म्हणून लाभ घेणे आवश्यक आहे.
संजयकाका पाटील म्हणाले की, ‘वालचंद’ने अनेक वर्षांपासून उत्तम विद्यार्थी घडविण्याची परंपरा जपली आहे. त्यामध्ये यापुढेही खंड पडणार नाही. नेहमी उत्तम कार्य करण्याचीच दृष्टी ठेवल्यास राष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल होण्यास वेळ लागणार नाही, असे सांगितले.
यावेळी वालंचदच्या माजी विद्यार्थी परिषदेचे हेमंत अभ्यंकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर, श्रीनिवास पाटील यांच्यासह प्राचार्य, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.