प्लास्टिक मुक्तीसाठी स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार : साड्यांपासून पिशव्या; बचत गटांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:16 PM2018-06-28T23:16:42+5:302018-06-28T23:18:12+5:30
प्लास्टिकला पूर्णपणे मूठमाती देत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला असून, कापडी पिशव्यांचे वाटप करण्याबरोबरच महिलांकडून विनावापराच्या साड्या संकलित करून त्यापासून पिशव्या तयार करून त्या
सांगली : प्लास्टिकला पूर्णपणे मूठमाती देत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला असून, कापडी पिशव्यांचे वाटप करण्याबरोबरच महिलांकडून विनावापराच्या साड्या संकलित करून त्यापासून पिशव्या तयार करून त्या व्यावसायिकांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वाने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या संस्थेतर्फे दीड लाखाहून अधिक पिशव्या तयार करून वितरित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ देत कापडी पिशव्या शिवून देण्यासाठी बचत गट सरसावले आहेत.
राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी घातल्यानंतर त्याच्या पर्यायावर चर्चा सुरू झाली. याचवेळी प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी पिशव्या वापरण्यास प्राधान्य देण्याचे आव्हान शहरातील स्वयंसेवी संस्थांनी स्वीकारत ते यशस्वी करून दाखविले आहे. घरा-घरात वापराविना पडून राहिलेल्या साड्यांची संख्या अधिक असते. या साड्यांपासून पिशव्या तयार करता येऊ शकतात, हे ओळखून संस्थांनी साड्या देण्याचे आवाहन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
सत्यवेध फाऊंडेशनच्यावतीने अर्चना मुळे यांनी सुरू केलेल्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांकडून संकलित करून १ हजारावर साड्या दिल्या आहेत. केवळ साड्या मिळवून उपयोग नाही तर पिशव्या शिवण्यासाठी लागणारी पैशांची गरज ओळखून त्यांनी ‘भगिनींनो साड्या द्या, भावांनो पैसे द्या’ उपक्रम राबविला आहे. आजवर त्यांनी ४५ हजारहून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे, तर प्लास्टिक बंदीनंतर मोठी मागणी होत आहे. केवळ सांगलीतच नव्हे, तर कोकणातही त्यांनी पिशव्या पाठविल्या आहेत. प्लास्टिकला पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यावर पूर्णपणे बंदी आणावी, यावर मुळे ठाम आहेत.
किशोर लुल्ला यांनी टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून कापडी पिशव्यांबाबत जनजागृती चालू केली आहे. त्यांनी स्वच्छ साड्या, पडदे, ब्लाऊज पीस, कटपीस किंवा बेडशीट देण्याचे आवाहन केले आहे. या कपड्यांपासून पिशव्या तयार करून त्या वितरित करण्यात येत आहेत. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतरही त्यांनी पुन्हा आवाहन केले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या साड्या मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने पिशव्या तयार करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी आता मिलमधून कापड आणून पिशव्या शिवण्याचे नियोजन केले आहे.
बचत गटांना संधी
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असणाºया महिला बचत गटांनाही प्लास्टिक बंदीचा फायदा होणार आहे. स्वयंसेवी संस्थांनी महिला बचत गटांशी संपर्क साधून कापडी पिशव्या शिवून देण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीनेही महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तालुकापातळीवर कापडी पिशव्या शिवणे, ब्राऊन पेपरची पाकिटे करणे, कागदी पाकिटे तयार करणे आदी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सत्यवेध फाऊंडेशनच्यावतीने सुरू केलेल्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याबरोबरच घरातील प्लास्टिक कमी करण्यासाठी शाळांमध्ये प्लास्टिक संकलन मोहीम सुरू करणार आहोत. विद्यार्थ्यांनी घरातील प्लास्टिक शाळेत जमा करावयाचे असून, ते संकलित केले जाणार आहे. प्लास्टिकला पर्याय असल्याने नागरिकांनी प्लास्टिक बंदीचे स्वागतच करायला हवे.
- अर्चना मुळे, सत्यवेध फाऊंडेशन
कापडी पिशव्यांना अपेक्षेपेक्षा चांगली मागणी दिसून आली. शहरातील अनेक मोठे दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांनीही कापडी पिशव्यांची नोंदणी केली आहे. मात्र, सध्या महिला वर्गाकडून साड्या मिळत नसल्याने पिशव्या तयार करण्यास अडचणी येत आहेत. सामाजिक भावनेतून सुरू असलेल्या या कामास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- किशोर लुल्ला, टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन