स्वयंसेवी संस्थांनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा :कापडणीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 03:00 PM2019-10-04T15:00:01+5:302019-10-04T15:10:27+5:30
मतदारांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मतदानाचा आपला हक्क बजावावा यासाठी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी नितीन कापडणीस यांनी केले.
सांगली : स्वयंसेवी संस्था, संघटनांची नेहमीच विविध उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाला महत्वपूर्ण साथ असते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. यामध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मतदानाचा आपला हक्क बजावावा यासाठी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी नितीन कापडणीस यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात स्वीप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपायुक्त राजेंद्र तेली यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, मतदारांना आपल्या मताचे मुल्य व मतदानाचे महत्व पटवून देवून लोकशाही बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे. यासाठी विविध उपक्रम स्वयंसेवी संस्थांनी राबवावेत. ज्या ठिकाणी मतदान कमी होते अशी ठिकाणे एनजीओंनी दत्तक घेवून मतदारांना व्यक्तीश: प्रबोधन करावे.
प्लॅस्टिक फ्री निवडणूक प्रक्रियेसाठी महत्वपूर्ण योगदान द्यावे. यामध्ये प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करण्याबाबत व मतदानानंतर वापरलेले साहित्य संकलित करण्यासाठी मदत करावी. नोकरी कामधंद्यानिमित्त मतदारसंघाबाहेर असणाऱ्या मतदारांना प्रयत्नपूर्वक मतदानासाठी उद्युक्त करावे. गत निवडणूकीत दिव्यांग मतदारांचे 80 टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले होते. या निवडणुकीत 90 टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावे यासाठी एनजीओंनी पुढाकार घ्यावा.
निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, मतदारांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देवून लोकशाही प्रक्रियेत त्यांच्या अधिकाधिक सक्रीय सहभागासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. सिव्हील सोसायटीच्या माध्यमातून अधिकाधिक चांगले काम एकत्रितपणे करूया आणि मतदानाचा टक्का वाढवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी ज्या ठिकाणी गत निवडणुकीत कमी मतदान झाले आहे त्या ठिकाणी मतदान वाढविण्यासाठी एनजीओंनी पुढाकार घेण्यात येईल असे सांगून प्रत्येक मतदाराला भेटून मतदानासाठी उद्युक्त करण्यात येईल अशी ग्वाही दिली. तसेच दिव्यांगासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनीही दिव्यांगाना मतदान केंद्रापर्यंत आणून त्यांचे सुलभ पध्दतीने मतदान होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.