निगडीच्या तरुणाचा तौक्ते वादळात सलग ११ तास समुद्रातून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:21 AM2021-05-30T04:21:57+5:302021-05-30T04:21:57+5:30
विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : ताशी १८० किलोमीटरच्या वेगाने वाहणारा वारा, तुफानी पाऊस, सेकंदाला ३६ फूट ...
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : ताशी १८० किलोमीटरच्या वेगाने वाहणारा वारा, तुफानी पाऊस, सेकंदाला ३६ फूट उंच उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा, विजेचा प्रचंड कडकडाट व भयाण काळोख अशा प्रतिकूल परिस्थितीतही तब्बल अकरा तास समुद्रात पोहत ‘त्याने’ मृत्यूवर विजय मिळवला. निगडी (ता. शिराळा) येथील राहुल रामचंद्र साळुंखे (वय २२) हे त्या तरुणाचे नाव.
तौक्ते वादळामुळे समुद्रात बुडालेल्या ‘बार्स पी पी ३०० पास’ या मॅथ्यू असोसिएट्सच्या जहाजावर राहुलबरोबर २७३ जण कामाला आहेत. समुद्रातून कच्चे तेल काढण्यासाठी हे अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. दि. १२ व १३ मे रोजी हवामान खात्याच्या अंदाजानुसार ज्याठिकाणी जहाज उभे होते, तेथे धोका नव्हता. तरीही २०० मीटर आणखी हे जहाज मागे घेऊन आठ नांगर टाकून दि. १४ रोजी उभे केले होते. हे ठिकाण मुंबईपासून शंभर किलोमीटर समुद्रात ‘हिरा फिल्ड’ या पॉईंटवर होते. १६ मे रोजी रात्री दहानंतर अचानक चक्रीवादळाने विक्राळ रूप धारण केले. यावेळी सर्व आठही नांगर तुटले व जहाज भरकटले व प्लॅटफॉर्मला जाऊन धडकले.
यावेळी जहाजामध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा, भयानक पाऊस अशा परिस्थितीत मृत्यू समोर दिसत होता. लाईफ ड्रमही या भयानक वेगामुळे फुटू लागले. यावेळी नौदलाला याबाबत माहिती दिली. त्यांनी दोन तासात पोहोचतो, असे सांगितले. मात्र, या दरम्यान हवेच्या व लाटांच्या वेगामुळे जवळपास ६५ किलोमीटर जहाज भरकटले. त्यामुळे नौदलाच्या जवानांना हे ठिकाण शोधण्यास वेळ लागला. दुपारी साडेतीनच्या दरम्यान नौदलाचे जवान आले. मात्र, ते जहाजाजवळ येण्यास धोका होता. जीव वाचविण्यासाठी राहुलसह सर्वांनी समुद्रात उड्या मारल्या.
नाैदलाच्या जवानांनी जे-जे मिळतील, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी राहुल व तासगाव येथील शेखर शेळके हे तब्बल अकरा तास पोहत राहिले. ‘एनडीए’च्या जवानांनी त्याला वाचवले. जवानांनी राहुल व सहकाऱ्यांना वाचवले व बाहेर आणले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना काही दिवसाची सुट्टी दिली. राहुल सध्या निगडी येथे आला आहे. यावेळी त्याने ही घटना सांगितली.