‘आयएमए’च्या संपाविरोधात ‘निमा’ची पिंक रिबन मोहीम;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:11 AM2020-12-05T05:11:04+5:302020-12-05T05:11:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून आयएमएने शुक्रवारी (दि. ११) ...

‘Nima’s Pink Ribbon Campaign against IMA’s strike; | ‘आयएमए’च्या संपाविरोधात ‘निमा’ची पिंक रिबन मोहीम;

‘आयएमए’च्या संपाविरोधात ‘निमा’ची पिंक रिबन मोहीम;

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून आयएमएने शुक्रवारी (दि. ११) देशव्यापी संप जाहीर केला आहे. त्याला आव्हान देताना आयुर्वेदिक डॉक्टरांची संघटना ‘निमा’ने पिंक रिबन मोहीम जाहीर केली आहे. यादिवशी राज्यभरातील आयुर्वेदिक डॉक्टर हाताला गुलाबी फीत बांधून रुग्णसेवा करतील. शिवाय रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत.

यानिमित्ताने आयएमए आणि निमा संघटना आमने-सामने आल्या आहेत. सरकारने पंधरवड्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेला परवानगीचा निर्णय जाहीर केला. अनेक जोखमीच्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रियांचा त्यात समावेश आहे. याला डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने तीव्र विरोध केला आहे.

निमाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सर्वांसाठी आरोग्य या सरकारच्या धोरणाला आयएमएने अपेक्षेप्रमाणे विरोध केला आहे. त्यांच्या प्रस्तावित संपाला निमाचा तीव्र विरोध राहील. सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी ठाम राहण्याचे निमाने ठरविले आहे. त्यानुसार ११ डिसेंबरला निमाशी सर्व संलग्न रुग्णालये सुरू ठेवली जातील.

आयएमएच्या संपाचा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील. निमाच्या देशभरातील १ हजार २०० शाखा यादिवशी पूर्ण ताकदीने आरोग्य सेवा देतील. प्रसंगी ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णसेवेत खंड पडू दिला जाणार नाही. सरकारच्या निर्णयाचे स्वागत म्हणून गुलाबी फिती बांधून काम केले जाईल.

चौकट

निमासह सर्व संघटना पिंक रिबनमध्ये

निमाच्या या उपक्रमात आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सर्व संघटना सहभागी होणार आहेत. आयएमएच्या संपामुळे रुग्णसेवा कोलमडू नये यासाठी पूर्ण क्षमतेने रुग्णालये सुरु ठेवणार आहेत.

कोट

आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी दिल्याने इतरांना पोटशूळ उठण्याचे कारण नाही. आयएमएच्या अनेक उपक्रमांना, आंदोलनांना आम्हीही वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. सरकारने आम्हाला शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिल्याने सर्वांना आरोग्य हा हेतू साध्य होणार आहे. त्यामुळे ११ डिसेंबररोजी निमासह सर्व आयुर्वेदिक डॉक्टरांच्या संघटना पिंक रिबनसह पूर्ण ताकदीने रुग्णसेवा देतील.

- डॉ. अनिल बाजारे, महाराष्ट्र सचिव, निमा

Web Title: ‘Nima’s Pink Ribbon Campaign against IMA’s strike;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.