पगार दिला नाही म्हणून साडेनऊ लाखाची रोकडच पळवली, कामगारासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 04:20 PM2022-10-15T16:20:30+5:302022-10-15T16:21:09+5:30
दिलीप मोहिते विटा ( सांगली ) : येथील शिवाजीनगर उपनगरात असलेल्या जिओ मार्ट दुकानातील ९ लाख ३३ हजार रुपयांची ...
दिलीप मोहिते
विटा (सांगली) : येथील शिवाजीनगर उपनगरात असलेल्या जिओ मार्ट दुकानातील ९ लाख ३३ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दुकानातील कामगारासह त्याच्या साथीदाराला विटा पोलिसांनी गजाआड केले. याप्रकरणी संशयित कामगार मनिष देवदास झेंडे (वय २१, मुळ रा. बलवडी (खा), ता. खानापुर, सध्या रा. नेवरी, ता. कडेगाव) यांच्यासह त्याचा साथीदार पवन मधुकर झेंडे (वय २१, रा. बलवडी (खा), ता. खानापुर) या दोघांना विटा पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातील ७ लाख ८० हजार रुपये रोख रकमेसह ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुकान मालकाने पगार न दिल्याने आपण साडेनऊ लाख रक्कम असलेली तिजोरीच पळवल्याचे संशयित कामगार मनीष झेंडे यांने पोलिसांना सांगितले.
विटा येथील कराड रस्त्यावरील जीओ मार्ट या ऑनलाईन किराणा दुकानाचे कुलूप तोडून आतील लोखंडी तिजोरीसह ९ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दि. ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री लंपास करण्यात आला होता. याबाबत सर्फराज शिकलगार यांनी विटा पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती. याबाबत १० ऑक्टोबर रोजी विटा पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी चोरट्यांचा तपास सुरू केला होता.
त्यावेळी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यानुसार तपास करता या दुकानातीलच कामगार संशयित मनिष देवदास झेंडे याला ताब्यात घेऊन याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार पवन मधुकर झेंडे यास बरोबर घेऊन चोरी केल्याची कबुली दिली.
दि. ९ रोजी मध्यरात्री कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश करून रोख रक्कम असलेली लोखंडी तिजोरी एका मोटारसायकलवरून पहिल्यांदा घरी नेली. त्यानंतर रात्री फरशी कापायच्या कटरने फोडून आतील पैसे काढले आणि ती फोडलेली तिजोरी नेऊन बुधवारी रात्री भिवघाटातून खाली टाकली असे संशयित झेंडे याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान मनीष झेंडे आणि त्याचा साथीदार पवन झेंडे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपयांची दुचाकी, अंदाजे १० हजार रुपये किंमतीची लोखंडी तिजोरी आणि ७ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम असे एकूण ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.