जत तालुक्यात वीज पडून नऊ जनावरे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:29+5:302021-04-15T04:25:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत शहर व तालुक्यात मंगळवारी सायंकाळी चारच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसावेळी वीज पडून नऊ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत शहर व तालुक्यात मंगळवारी सायंकाळी चारच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसावेळी वीज पडून नऊ जनावरांचा मृत्यू झाला. बेदाणा, हळद, मका, आंबा, शेवग्याच्या शेंगा व वाळलेली वैरण यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मंगळवारी जादा उकाडा जाणवत होता. सायंकाळी चारच्या दरम्यान विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. बसर्गी (ता. जत) येथील कलाप्पा सिद्राया तावंशी त्यांच्या घरापासून दोनशे मीटरवरील चिंचेच्या झाडावर वीज पडून झाडाखाली बांधलेल्या दोन गावरान म्हशींचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे सुमारे एक लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
एकुंडी येथील श्रीमंत नामू कट्टीकर यांच्या तीन मेंढ्या व आप्पासाहेब मुरारी कट्टीकर यांच्या तीन मेंढ्या रानात चरत असताना अंगावर वीज पडून ठार झाल्या. आसंगी तुर्क येथील रामू शिवराया लोणी यांची देशी गाय रानात चरत असताना तिच्या अंगावर वीज पडली. बसर्गी येथील चंद्रकांत बामणे यांच्या घराजवळ वीज पडल्यामुळे लिंबाच्या झाडाखाली चरत असलेल्या काही कोंबड्यांचा मृत्यू झाला.
द्राक्षाची काढणी सुरू आहे. या पावसामुळे द्राक्ष पिकावर कोणतेही विपरीत परिणाम झाले नाहीत. पाऊस पडल्यानंतर कोरडे हवामान तयार झाल्यामुळे परिणाम होणार नाहीत, असे मत द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केले. परंतु बेदाणा, हळद, मका, आंबा, शेवग्याच्या शेंगा व वाळलेली वैरण यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश माळी यांनी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल सोनार यांनी पंचनामा केला असून मदतीसाठी प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.