जतचे नऊ नगरसेवक अपात्र
By Admin | Published: July 23, 2014 10:46 PM2014-07-23T22:46:15+5:302014-07-23T22:59:16+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : स्थगितीसाठी प्रयत्न
जत : जत नगरपालिकेच्या नऊ नगरसेवकांनी वेळेत खर्चाचा तपशील दिला नाही म्हणून जिल्हाधिकारी सांगली यांनी त्यांना अपात्र ठरविले आहे. यामध्ये एका स्वीकृत सदस्याचा समावेश आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी मुंबईत प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेमुळे सत्ताधारी वसंतदादा विकास आघाडीत खळबळ माजली आहे.
डिसेंबर २०१२ मध्ये जत नगरपालिकेची निवडणूक झाली. यावेळी नगरसेवक इकबाल गवंडी, श्रीकांत शिंदे, मनोहर पट्टणशेट्टी, शुभांगी बन्नेनवार, नंदा कांबळे, माया साळे, लीलाबाई कोळी, संगीता माळी व स्वीकृत नगरसेवक सुजय शिंदे यांनी एक दिवस उशिरा खर्च सादर केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी या नऊजणांना कारणे दाखवा नोटीस देऊन म्हणणे मागवून घेतले होते; परंतु त्यांचा खुलासा समाधानकारक नसून, ते निवडणूक नियमाला धरून नाही. त्यामुळे तुमचे नगरसेवक पद रद्द ठरविण्यात येत आहे, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला.
नगरपालिकेत बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे गटाची सत्ता असून, ते माजी मंत्री मदन पाटील समर्थक आहेत. त्यांचे आठ नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन नगरसेवकांची मदत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली आहे.राष्ट्रवादीच्या तीनपैकी एक उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी लोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांचा प्रचार केला म्हणून त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करुन तो मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे सध्या उपनगराध्यक्षपद रिक्त आहे.
सत्ताधारी गटाचे नेते सुरेश शिंदे यांनी अपात्र ठरविण्यात आलेल्या नगरसेवकांना कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे ऐनवेळी इतरांची मदत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला न्यायालयातून किवा नगरविकास विभागातून स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. (वार्ताहर)