उपमहापौरांसह नऊ नगरसेवक ‘नाॅट रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:14 AM2021-02-20T05:14:53+5:302021-02-20T05:14:53+5:30

सांगली : महापौर, उपमहापौर निवडीवरून सत्ताधारी भाजपमध्ये गुरुवारी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. नऊ नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरविली असून, ...

Nine councilors, including deputy mayors, 'not reachable' | उपमहापौरांसह नऊ नगरसेवक ‘नाॅट रिचेबल’

उपमहापौरांसह नऊ नगरसेवक ‘नाॅट रिचेबल’

Next

सांगली : महापौर, उपमहापौर निवडीवरून सत्ताधारी भाजपमध्ये गुरुवारी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. नऊ नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरविली असून, ते ‘नाॅट रिचेबल’ आहेत. बैठकीला ३० ते ३२ नगरसेवकच उपस्थित होते. रात्री तीन नगरसेवकांना शहराबाहेर जाण्यापासून रोखण्यात भाजपला यश आले. रात्री उशिरा तीस नगरसेवकांना गोवा सहलीवर पाठविण्यात आले.

महापौर, उपमहापौर निवडीवरून भाजपमध्ये कुरबुरी सुरू होत्या. बुधवारी सायंकाळी महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांचे नाव निश्चित झाले. भाजपची नावे निश्चित होताच राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये आले. त्यांनी भाजपच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. या नगरसेवकांना गळ्याला लावण्याचे काम सुरू झाले.

भाजपचे १३ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आले होते. त्यातील चार जणांना सायंकाळीच अज्ञातस्थळी हलविण्यात आले, तर आणखी चार जणांशी चर्चा सुरू होती. त्यातील तिघेजण एका नगरसेविकाच्या घरात अज्ञातस्थळी जाण्यासाठी जमले होते. भाजपच्या एका नगरसेविकेसोबतची बोलणी फिसकटली. त्या नगरसेविकने राष्ट्रवादीच्या रणनीतीची माहिती भाजपच्या नेत्यांना दिली. आतापर्यंत बेसावध असलेल्या भाजपच्या नेत्यांसह महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी व त्यांचे समर्थक खडबडून जागे झाले. त्यांनी थेट नगरसेविकेचे घर गाठले. याचदरम्यान राष्ट्रवादी व काँग्रेसचे समर्थकही त्यांच्या घरासमोर जमा झाले होते. पोलिसांनी याची कुणकुण लागताच त्यांनी दोन्ही समर्थकांना घरापासून दूरपर्यंत हटकले. अखेर पहाटेच्या सुमारास भाजपच्या नेत्यांनी या तीन नगरसेवकांना एका हाॅटेलवर नेऊन ठेवले.

दरम्यान, उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह मिरजेतील काही नगरसेवकांशी भाजपच्या नेत्यांनी संपर्क सुरू केला. पण ते गायब झाले होते. सकाळी ११ वाजता आमराई क्लबमध्ये भाजप नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ३० ते ३२ नगरसेवकच उपस्थित होते. उर्वरित नगरसेवक ‘नाॅट रिचेबल’ झाल्याने भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. महापौर व उपमहापौरपदाचा अर्ज दाखल करतानाही भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवत होता. त्यामुळे आता २३ फेब्रुवारीस निवडीवेळी महापालिकेतील सत्ता समीकरणे बदलणार की नाराजी दूर करून भाजप सत्ता टिकविण्यात यशस्वी ठरणार याचा फैसला होईल.

चौकट

‘मनी पाॅवर’ ठरतेय भारी

महापौर, उपमहापौर निवडीत सध्या ‘मनी पाॅवर’ची चर्चा रंगली आहे. भाजप व विरोधी आघाडीकडून घोडेबाजाराला ऊत आला आहे. भाजपपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्ता उलथविण्यासाठी पाच नगरसेवकांची गरज आहे. सध्या नऊ नगरसेवक गायब आहेत. त्यापैकी कितीजण आघाडीच्या गळ्याला लागतात, यावर सत्तेचे गणित अवलंबून आहे.

चौकट

महापौरही नाराज

उपमहापौरांसह महापौर गीता सुतार याही भाजपच्या कारभारावर नाराज आहेत. पक्षाच्या बैठकीला त्यांना निमंत्रण दिले होते. त्यानुसार त्यांनी सकाळी आमराई क्लबमधील बैठकीला हजेरी लावली. पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मात्र त्यांना भाजप नेत्यांनी बोलाविले नाही. सुतार महापौर दालनात असतानाही भाजप नेत्यांनी त्यांना बेदखल केल्याने त्या नाराज असल्याचे सांगण्यात आले.

चौकट

नगरसेविकेमुळे तिघे परत

राष्ट्रवादीने चार नगरसेवकांना गळ्याला लावले होते. त्यांच्याशी बोलणी केली होती. एका नगरसेविकेची अपेक्षा मात्र थोडी जास्त होती. ती पूर्ण करण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नकार दिला. त्यामुळे या नगरसेविकेने भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधून राष्ट्रवादीच्या नियोजनाची माहिती दिली. त्यानुसार तिघेजण अज्ञातस्थळी जाण्यासाठी थांबले होते. याची माहिती मिळताच धीरज सूर्यवंशी व इतरांनी तिथे जाऊन त्यांना एका हाॅटेलवर नेल्याची चर्चा महापालिकेत रंगली होती.

Web Title: Nine councilors, including deputy mayors, 'not reachable'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.