युरियामिश्रित पाणी पिल्याने सावळीत नऊ शेळ्यांचा मृत्यू
By admin | Published: January 7, 2015 11:10 PM2015-01-07T23:10:16+5:302015-01-07T23:24:38+5:30
सावळीतील घटना : पोलिसात गुन्हा दाखल
कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील तगारे पोल्ट्री फार्मलगतच्या पार्श्वनाथ खत गोदामामधील पाण्याच्या टाकीलगतचे सांडपाणी पिल्याने नऊ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवारी) उघडकीस आली. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी युरियामिश्रित पाण्याचे नमुनेही ताब्यात घेतले आहेत.
कुपवाड एमआयडीसीलगत सावळीच्या हद्दीमध्ये पार्श्वनाथ खत गोदाम आहे. त्याठिकाणी गोदाम मालकाने पाण्याची प्लॅस्टिकची टाकीही ठेवली आहे. या टाकीलगत सांडपाणी पडले होते. यामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रकमधील युरिया पडला होता. त्यामुळे हे पाणी युरियामिश्रित झाले होते. हे पाणी पिल्याने बामणोली (ता. मिरज) येथील आनंदा पालखे व ज्ञानोबा सरगर यांच्या मालकीच्या नऊ शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडल्याचे शेळी मालकाने सांगितले. शेळी मालकाचे ८० हजारांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्या तेजश्री चिंचकर घटनास्थळी आल्या. त्यांनी पंचायत समितीच्या प्रशासनाला ही माहिती कळविली. नंतर पोलिसांसह पशुसंवर्धन विभागाने पंचनामे केले़ याप्रकरणी पोलीस प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविले. या सांडपाण्याचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. दादासाहेब पालखे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. हवालदार एस. ए. शिंदे तपास करीत आहेत. (वार्ताहर)