ढालगावमध्ये नऊ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:29 AM2021-02-11T04:29:27+5:302021-02-11T04:29:27+5:30
ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे मंगळवारी मध्यरात्री एका घरातून नऊ तोळे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कमेसह चार ...
ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे मंगळवारी मध्यरात्री एका घरातून नऊ तोळे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कमेसह चार लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. विशेष म्हणजे कपाटाला लॉक असतानाही चोरट्यांनी चावी हस्तगत करून चोरी केली. याबाबत शंकर महादेव देसाई यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शंकर देसाई यांचा जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ढालगाव येथे ते कुटुंबासह राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी सासरहून माहेरी आली आहे. मंगळवारी रात्री देसाई कुटुंबीय जेवण करून सर्वजण झोपी गेले. यावेळी देसाई यांच्या पत्नी व मुलीने त्यांचे दागिने घरातील कपाटामध्ये ठेवले होते. तसेच देसाई यांनी जनावरांच्या खरेदी-विक्री व्यवहारातील रोख ४७ हजार रुपयेही कपाटात ठेवून ते लॉक केलेे होते. कपाटाची चावी कपाटा शेजारील ठेवली होती.
शंकर देसाई व त्यांच्या घरातील सदस्य घराबाहेर लागून असणाऱ्या एका खोलीत झोपले होते तर देसाई यांचे सासरे घरात झोपले होते. यामुळे घराचा मुख्य दरवाजा कडी न घालताच नुसता पुढे करून बंद देला होता. मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी घरात प्रवेश केला. कपाटाशेजारील चावीने दरवाजा उघडून चोरी केली. यात सोन्याचे दोन गंठन, चैन, भोरमाळ, रिंगा, झुबे, कर्णवेल, अंगठी असे नऊ तोळ्याचे सोने व चांदीचे पैंजन तसेच रोख ४७ हजार रुपये चोरांनी लंपास केले.
बुधवारी सकाळी शंकर देसाई यांचा मुलगा झोपेतून उठल्यावर घरात चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी कठवेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी करे, पोलीस हवालदार सुहास चव्हाण हे अधिक तपास करत आहेत.
चाैकट
माहितीगार चोरट्यावर संशय
देसाई यांच्या घरातील कपटाशेजारीच चावी होती. याची माहिती चोरट्यास असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. त्या अनुषंगाने पथकाने चावीचा वास श्वानास दिल्यावर ते देसाई यांच्या घरापासून मुख्य मार्गापर्यंत चोराचा माग काढत गेले; पण ते तेथेच घुटमळले.