जिल्ह्यातून नऊ लाखांचा निधी जमा
By admin | Published: September 16, 2016 11:08 PM2016-09-16T23:08:46+5:302016-09-16T23:44:00+5:30
डॉल्बीला फाटा : गणेश मंडळांनी केली जलयुक्त शिवार योजनेला मदत
सांगली : गणपती बाप्पांसमोर डॉल्बीचा आवाज करण्याला फाटा देऊन शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला मदत करण्यात खानापूर तालुक्यातील गणेश मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यात सर्वाधिक निधी जमा करण्यात खानापूर तालुका अव्वल ठरला आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी ३ सप्टेंबर रोजी भावे नाट्यगृहात सांगली जिल्ह्यातील
युवकांना भावनिक साद घातली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी यासंदर्भात विटा येथे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर व पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. संपूर्ण तालुक्यात १५ ते २० बैठका घेऊन त्यांनी हा संदेश ग्रामस्तरावर पोहोचवला. या विधायक उपक्रमाला खानापूर तालुक्यातील १० गणेश मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला. सांगली जिल्ह्यात या उपक्रमातून एकूण ९ लाख १४ हजार रुपये निधी जमा झाला आहे. त्यातील १ लाख २५ हजार रुपये निधी विटा पोलिस ठाण्याअंतर्गत १० गणेश मंडळांनी दिला आहे. या मदतीमधून जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत कामे राबवण्यात येणार आहेत. याबाबत विट्याचे पोलिस निरीक्षक मोहन जाधव म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या प्रेरणेने व जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विट्याचे उपविभागीय अधिकारी अमरसिंह निंबाळकर आणि मी संपूर्ण तालुक्यात बैठका घेतल्या. त्यातून जनप्रबोधन केले. तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. ते कमी करण्यासाठी शासनाची जलयुक्त शिवार योजना कामी येणार आहे, हे पटवून दिले.
आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गार्डी येथे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही हा खारीचा वाटा उचलला आहे. भविष्यातही आमचे मंडळ हा सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करेल. (प्रतिनिधी)
शासनाचा चांगला उपक्रम : अमोल बाबर
खानापूर तालुक्यात सर्वात जास्त ५१ हजार रुपये मदत विट्याचा राजा गणेश मंडळाने केली आहे. याबाबत मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर म्हणाले, पाण्याची टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना अत्यंत उपयोगी आहे, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणून अन्य उपक्रमावर निधी खर्च करण्याऐवजी जलयुक्त शिवार योजनेला मदत केली आहे. अन्य मंडळांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.