सांगलीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, संशयित आरोपीस अटक
By घनशाम नवाथे | Published: October 9, 2024 02:27 PM2024-10-09T14:27:32+5:302024-10-09T14:27:58+5:30
संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, परिसरातील गांजा, दारूचा अड्डा उध्वस्त
सुरेंद्र दुपटे
संजयनगर : अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेने सांगली परिसर पुन्हा एकदा हादरल्याचे दिसले. संजयनगर परिसरात नऊ वर्षाच्या चिमुरडीवर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमाराला बलात्कार झाला. याप्रकरणी संशयित आरोपी ईश्वर महादेव कांबळे (वय २६) याला संजयनगर पोलिसांनी तातडीने अटक केली.
आज, बुधवारी हा प्रकार समजताच संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून निदर्शने केली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. ज्या परिसरात हा प्रकार घडला त्या बंद स्वच्छतागृहाजवळील दारू व गांजा अड्डा उध्वस्त केला.
याबाबत माहिती अशी, नऊ वर्षाच्या एका चिमुकलीला मोबाईल दाखवतो म्हणून ईश्वर कांबळे याने तिला तेथे आणले. तिच्यावर बलात्कार केला. त्या मुलीला त्रास होऊ लागला. तिने आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानी संजयनगर पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरा फिर्याद नोंदवून ईश्वर कांबळेला अटक केली.
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. तत्काळ परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला. संतप्त नागरिकांनी ज्याठिकाणी हा प्रकार घडला तेथील दोन खोल्या पाडून जमिनदोस्त केल्या. पोलिसांनी तेथे धाव घेतली. तेव्हा आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करत नागरिकांनी शंभर फुटी रस्ता येथे चौकात रास्ता रोको केला. यावेळी दीपक माने, देवानंद शिखरे, माजी नगरसेवक विलास सर्जे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
काल रात्रीच पिडित मुलीची शासकीय रुग्णालयातमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. संशयित आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा काटेकोरपणे तपास केला जाईल. -बयाजीराव कुरळे, पोलिस निरीक्षक, संजयनगर