‘निनाई’च्या कर्मचाऱ्यांचा ठिय्या
By admin | Published: December 14, 2014 09:59 PM2014-12-14T21:59:43+5:302014-12-14T23:54:10+5:30
कार्यस्थळावर आंदोलन : जुन्या कर्मचाऱ्यांना सामावून घ्या
सागाव : निनाईदेवी सह. साखर कारखान्याच्या जुन्या कर्मचाऱ्यांना दालमिया शुगर कंपनीत कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी मागणी आज कर्मचाऱ्यांनी केली. कारखाना कार्यस्थळावर आंदोलनास बसलेल्या कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. यावेळी सर्व कामगारांनी निर्णय होईपर्यंत येथेच बसणार असल्याचे सांगितले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याचे ४०० हून अधिक कर्मचारी कायम व हंगामी आहेत. त्यांना कायम सेवेत घ्यावे, व्हेज बोर्डप्रमाणे वेतन द्यावे, मागील थकित पगार, प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी थांबली आहे, ती द्यावी, कारखान्यास बक्षीसपत्राद्वारे दिलेल्या जमीनदारांच्या वारसांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे. वरील मागण्या मान्य होईपर्यंत सर्व कर्मचारी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर शांततेच्या मार्गाने बसणार असल्याचे कर्मचारी संघटनेने सांगितले.
यावेळी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, भगवान गायकवाड, विठ्ठल पाटील, शंकर वनारे, तानाजी पाटील, मोहन जाधव, नथुराम दंडवते, जयवंत डांगे, मोहन पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)