महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये सव्वानऊ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:50+5:302021-07-22T04:17:50+5:30
इचलकरंजी येथे सुनेचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याने शुभदा जोशी या सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पती ...
इचलकरंजी येथे सुनेचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याने शुभदा जोशी या सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पती व दोन मुलांसोबत दि. १६ रोजी महालक्ष्मी एक्स्प्रेसने ठाणे ते हातकणंगले असा प्रवास करीत होत्या. २५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स शुभदा जोशी या आपल्या डोक्याखाली ठेवून झोपल्या होत्या. मध्यरात्री जोशी व त्यांच्या कुटुंबियांना झोप लागल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने पहाटे पाच वाजता कऱ्हाड स्थानक सुटताच जोशी यांच्या डोक्याखाली असलेली पर्स चोरून पलायन केले. पर्स गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हवालदिल झालेल्या जोशी कुटुंबियांनी रेल्वेत शोधाशोध केली. मात्र पर्स सापडली नाही. याबाबत शुभदा जोशी यांनी मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. रेल्वे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. जोशी यांच्यावर पाळत ठेवून चोरट्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे.
कोरोना साथीमुळे बंद असलेल्या एक्स्प्रेस रेल्वे सुरू होत असून, रेल्वेत चोऱ्या करणारे गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले आहेत. सध्या पॅसेंजर बंद आहेत. एक्स्प्रेसमध्येही आरक्षित तिकीटधारकांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. मात्र तरीही चोरट्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मोठी चोरी केल्याने खळबळ उडाली होती.