कोल्हापूर- सोलापूर , सातारा जिल्ह्यांपेक्षा सांगली जिल्ह्याची लोकसंख्या कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:18 AM2019-07-11T00:18:25+5:302019-07-11T00:23:11+5:30
पुणे आणि मुंबई या दोन शहरात नोकरी व रोजगाराच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सातारा, सोलापूर व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांपेक्षा सांगली जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे.
अविनाश कोळी ।
सांगली : रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांकडे जाणारे लोक व त्यांच्या कुटुंबांमुळे गेल्या ९० वर्षांत सर्वात कमी लोकसंख्या वाढ गत दशकात नोंदली गेली आहे. २००९ च्या तुलनेत २०११ च्या लोकसंख्या वाढीचा दर ७.७ टक्क्यांनी घटला आहे. लोकसंख्या वाढीच्या दराच्या प्रमाणात येथील घनताही वाढल्याचे दिसत आहे.
सांगली जिल्ह्याच्या दशकीय जनगणनेचा इतिहास पाहिला, तर १९०१ ते १९११ आणि १९११ ते १९२१ या काळात लोकसंख्येत घट झाली होती. त्यानंतर सातत्याने १४ ते २५ टक्क्यांपर्यंत लोकसंख्या वाढीचा दर राहिला. २००१ ते २०११ या दशकात केवळ ९.१८ टक्केच लोकसंख्या वाढ झाली. गेल्या ९० वर्षांतील ही सर्वात नीचांकी वाढ आहे. लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. ही बाब एका बाजूला समाधानकारक वाटत असली, तरी त्यात स्थलांतराचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. दोन किंवा एका मुलावर शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्याचे वाढत जाणारे प्रमाण जसे याला कारणीभूत आहे, त्याचपद्धतीने रोजगारासाठी मोठ्या शहराकडे धावणारे कुशल कामगार, सुशिक्षित तरुण व अन्य वर्ग यामुळेही वाढीच्या दरावर परिणाम दिसून येतो.
पुणे आणि मुंबई या दोन शहरात नोकरी व रोजगाराच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखादी व्यक्ती तिथे स्थिरावली की, पूर्ण कुटुंब त्याबरोबर स्थलांतरित होत असते. रोजगाराच्या मर्यादा, बंद पडणारे उद्योग, घटणारा व्यापार यामुळे जिल्ह्याच्या अर्थचक्रावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आता जनगणनेच्या नोंदीत दिसून येत आहेत. लोकसंख्येबाबत सांगली जिल्हा राज्यात पंधराव्या क्रमांकावर आहे. सातारा, सोलापूर व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांपेक्षा सांगली जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे.
लोकसंख्येतील स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाण पाहिले, तर जिल्ह्याचे सध्याचे प्रमाण ९६४ इतके आहे. २००१ मध्ये ते ९५७ इतके होते. गुणोत्तर प्रमाणात जिल्हा राज्यात १० व्या क्रमांकावर असून, पुणे विभागात साताºयाखालोखाल सांगलीचा क्रमांक लागतो, मात्र बालकांमधील गुणोत्तर प्रमाणाबाबत सांगली जिल्हा अत्यंत वाईट स्थितीत आहे. बालकांमधील स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण ८६२ इतके कमी आहे.
ग्रामीणचे : प्रमाण कमी
जिल्ह्यात दशकातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण पाहिले, तर ग्रामीण लोकसंख्येची वाढ ७.८ असून, शहरी लोकसंख्या वाढ १३.६ इतकी आहे. शहरी लोकसंख्या सध्या २५.५ टक्के इतकी असून, ग्रामीण लोकसंख्या ७४.५ इतकी आहे.
जत, मिरजेची वाढ अधिक
तालुकानिहाय लोकसंख्या वाढीचा दर पाहिल्यास सर्वाधिक वाढीचे प्रमाण हे जतमध्ये १५.६ टक्के, इतके नोंदले गेले आहे. त्याखालोखाल मिरजेचे प्रमाण १३ टक्के इतके आहे. शिराळयातील प्रमाण सर्वात कमी म्हणजे २.९ टक्के आहे.