स्थायी समितीच्या सभापतिपदी निरंजन आवटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:31 AM2021-09-10T04:31:54+5:302021-09-10T04:31:54+5:30

फोटो लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आठ दिवस फोडाफोडी, कुरघोड्यांनी रंगलेल्या खेळात महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद राखण्यात भाजपला गुरुवारी ...

Niranjan Avati as the Chairman of the Standing Committee | स्थायी समितीच्या सभापतिपदी निरंजन आवटी

स्थायी समितीच्या सभापतिपदी निरंजन आवटी

Next

फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आठ दिवस फोडाफोडी, कुरघोड्यांनी रंगलेल्या खेळात महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद राखण्यात भाजपला गुरुवारी यश आले. भाजपचे निरंजन आवटी यांनी काँग्रेसच्या फिरोज पठाण यांचा ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. सलग तिसऱ्यावर्षी सभापतीपद मिरजेला मिळाले.

महापालिकेत बहुमत असतानाही भाजपला अडीच वर्षानंतर महापौर, उपमहापौर निवडीवेळी धक्का बसला होता. सात नगरसेवक फुटल्याने महापौरपद गमावावे लागले होते. त्यामुळे स्थायी समिती सभापती निवडीत भाजप सावध होती. निवडीची तारीख निश्चित होताच विरोधी काँग्रेसने फोडाफोडी सुरू केली. तीन नगरसेवकांशी संपर्क साधून बोलणी केली. त्यामुळे भाजपने ‘स्थायी’च्या नऊ सदस्यांना हैदराबादला सहलीवर पाठविले. शेवटपर्यंत या सदस्यांना एकसंध ठेवण्यात यश आले.

स्थायी समितीत भाजपचे बहुमत आहे. त्यात सभापतिपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. अखेर निरंजन आवटी यांना उमेदवारी मिळाली. बुधवारी भाजपकडून आवटी व काँग्रेसकडून फिरोज पठाण यांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी सकाळी साडेअकराला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. भाजपच्या सदस्यांनी सोलापुरातून ऑनलाईन सभेला हजेरी लावली; तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य महापालिकेत होते. डुडी यांनी अर्जांची छाननी केली. दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. १५ मिनिटांत कोणीच माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले. यावेळी आवटी यांना ९, तर पठाण यांना ७ मते पडली. त्यानंतर आवटी यांना विजयी घोषित करण्यात आले. विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. सलग तिसऱ्यावर्षी सभापतिपदाची संधी मिरजेला मिळाली.

चौकट

वडिलांनंतर दोन्ही मुले सभापती

महाआघाडीच्या काळात निरंजन आवटी यांचे वडील, भाजपचे ‘हेवीवेट’ नेते सुरेश आवटी स्थायी समितीचे सभापती होते. त्यानंतर भाजपच्या सत्ताकाळात दुसऱ्यावर्षी निरंजन यांचे लहान बंधू संदीप यांना सभापतिपदाची संधी मिळाली. आता निरंजन सभापती झाले. वडील आणि दोन्ही मुले स्थायी सभापती झाल्याची घटना पहिल्यांदाच महापालिका इतिहासात घडली.

चौकट

ना जल्लोष, ना गुलालाची उधळण

सभापती निवडीनंतर महापालिकेत सामसूम होती. भाजपचे नूतन सभापती आवटी यांच्यासह सर्व नऊ सदस्य व नेते सोलापुरात होते. भाजपचे नगरसेवक महापालिकेकडे फिरकलेच नाहीत. आवटी समर्थकांनी केवळ फटाक्यांची आतषबाजी केली. जल्लोष किंवा गुलालाची उधळण करण्यात आली नाही.

Web Title: Niranjan Avati as the Chairman of the Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.