महापौरपदावरून काँग्रेसमध्ये निरंजन आवटींची बंडखोरी

By admin | Published: February 3, 2016 12:34 AM2016-02-03T00:34:37+5:302016-02-03T00:34:37+5:30

हारुण शिकलगार यांना उमेदवारी : उपमहापौरपद वंचित गटाला देण्याचा काँग्रेसचा निर्णय; आवटी गट आक्रमक

Niranjan Awati's rebellion in the Congress over the Mayor post | महापौरपदावरून काँग्रेसमध्ये निरंजन आवटींची बंडखोरी

महापौरपदावरून काँग्रेसमध्ये निरंजन आवटींची बंडखोरी

Next

सांगली : महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीवरून काँग्रेसअंतर्गत गटबाजी मंगळवारी उफाळून आली. महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक हारुण शिकलगार व उपमहापौरपदासाठी विजय घाडगे यांच्या नावाची घोषणा होताच नगरसेवक सुरेश आवटी गट आक्रमक झाला. या गटानेही महापौरपदासाठी निरंजन आवटी व उपमहापौरपदासाठी प्रदीप पाटील यांचा अर्ज दाखल करीत बंडखोरी केली.
मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी सहाजणांनी सात अर्ज दाखल केले. महापौरपदासाठी काँग्रेसमधून हारुण शिकलगार, बंडखोर निरंजन आवटी, राष्ट्रवादीतून विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, स्वाभिमानी आघाडीतून स्वरदा केळकर यांनी, तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसमधून विजय घाडगे, प्रदीप पाटील, राष्ट्रवादीतून राजू गवळी, संगीता हारगे, ‘स्वाभिमानी’तून स्वरदा केळकर, संगीता खोत यांनी अर्ज दाखल केले आहे. शनिवारी (६ फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता महापौर निवडीची सभा होत आहे.
महापौर निवडीवरून सत्ताधारी कॉँग्रेसमध्ये सुरुवातीपासून फाटाफूट झाली होती. एका गटाने नावाची शिफारस करण्यासाठी पैशाचा बाजार मांडला होता. दहा ते बारा नगरसेवकांच्या या गटाने नेत्यांवर दबाव वाढवला होता. या गटाच्या हालचाली पाहून सुरेश आवटी गटाने मोर्चेबांधणी केली होती. रविवारी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत महापौर, उपमहापौर निवडीचे सर्वाधिकार जयश्रीताई मदन पाटील यांना देण्यात आले.
मंगळवारी सकाळपासून इच्छुकांनी ‘विजय’ बंगल्यावर पुन्हा शक्तिप्रदर्शन केले. दुपारी एकनंतर आमदार पतंगराव कदम यांच्या बंगल्यात पक्षनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सहाही इच्छुकांच्या पुन्हा मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर हारुण शिकलगार व सुरेश आवटी ही दोन नावे पुढे आली.
दोघांनाही एकत्रित बसवून एकमत करण्याचा प्रयत्न झाला, पण अखेरपर्यंत त्यांच्यात एकमत झाले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अर्धा तास शिल्लक असताना शिकलगार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, तर काँग्रेसमधील वंचित गटाला उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी वंचित गटाच्या नगरसेवकांशी चर्चा करीत विजय घाडगे यांचा अर्ज भरण्याची सूचना नेत्यांनी केल्याचे स्पष्ट केले.
मुदत संपण्यास पंधरा मिनिटे शिल्लक असताना काँग्रेसकडून शिकलगार व घाडगे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तोपर्यंत आवटी गटानेही अर्ज भरण्याची तयारी केली. अवघ्या पाच मिनिटात आवटी गटाकडून निरंजन आवटी यांनी महापौरपदासाठी, तर प्रदीप पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला.
पक्षाने व्हीप बजावला असतानाही त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनी सूचक, अनुमोदक म्हणून सह्या केल्या. काँग्रेसमध्ये अचानक झालेल्या या बंडखोरीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. (प्रतिनिधी)
दहा महिन्यांचा कालावधी
दोन्ही पदांसाठी दहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पुढील अडीच वर्षांत तीन महापौर व उपमहापौर केले जाणार असल्याचे काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व गटनेते किशोर जामदार यांनी स्पष्ट केले. या पदासाठी काँग्रेसमधून सहाजण इच्छुक होते. त्यापैकी एकाला उपमहापौरपद देण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी सुरेश आवटी, राजेश नाईक यांची संभाव्य महापौर म्हणून चर्चा सुरू होती.

काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकमताने उमेदवार निश्चित केला आहे. दहा महिन्यांनंतर दोन्ही पदाधिकारी राजीनामे देतील. सुरेश आवटी व त्यांच्या समर्थक नगरसेवकांची समजूत काढू. शिवाय इतर पक्षांतील नेत्यांशीही चर्चा करणार आहोत.
- जयश्रीताई पाटील, काँग्रेस नेत्या

Web Title: Niranjan Awati's rebellion in the Congress over the Mayor post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.