‘निर्भया रॅली’ने सांगलीच्या सन्मानात भर!

By admin | Published: October 15, 2016 11:26 PM2016-10-15T23:26:11+5:302016-10-15T23:26:11+5:30

सदाभाऊ खोत : सायकल रॅलीस प्रारंभ; जिल्ह्यात सहाशे किलोमीटर करणार प्रवास

'Nirbhaya Rally' is full of honor in Sangli! | ‘निर्भया रॅली’ने सांगलीच्या सन्मानात भर!

‘निर्भया रॅली’ने सांगलीच्या सन्मानात भर!

Next

सांगली : जिल्हा पोलिस दलाने आयोजित केलेल्या ‘निर्भया सायकल रॅली’च्या माध्यमातून महिलांचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संतुलन आणि शारीरिक व्यायाम अशी चतुसूत्री साध्य होणार आहे. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम होत असल्याने सांगलीच्या सन्मानात भर पडणार आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय एकात्मता, महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी १५ आॅक्टोबर ते २१ आॅक्टोबरदरम्यान ६०२ किलोमीटर अंतराच्या ‘निर्भया सायकल रॅली’चे आयोजन केले आहे. येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या आवारात शनिवारी सकाळी खोत यांच्याहस्ते रॅलीचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, महापौर हारुण शिकलगार, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी), सुहास पाटील उपस्थित होेते. खोत म्हणाले, पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम होत असल्याने सांगलीच्या सन्मानात भर पडणार आहे. महिलांचा सन्मान आणि सायकलच्या माध्यमातून प्रदूषण वाढणार नाही, हे हेतू साध्य होतील. तळागाळातील माणसाला पोलिस दल आपल्या सोबत आहे, हा विश्वास निर्माण होईल. पोलिस दलाचीही प्रतिमा उंचावणार आहे. सामान्य माणसाला निर्भयपणे जगता येईल, असा संदेश दिला आहे.
पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या कल्पनेतून सांगली जिल्ह्यात महिला सुरक्षेसाठी निर्भया पथके तैनात केली आहेत. महिलांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्यांना तसे वातावरण आहे, याची खात्री देणे महत्त्वाचे आहे. २१ आॅक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ही रॅली फिरणार आहे. यामध्ये ६९१ जणांनी सहभाग नोंदविला आहे.
सायकल रॅलीत माधवनगर (ता. मिरज) येथील गोविंद परांजपे, सांगलीवाडीचे दत्ता पाटील या ज्येष्ठ सायकलपटूंसह अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. १७ शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी व जनतेला रॅलीचे महत्त्व सांगितले जाणार आहे. रॅलीच्या रस्त्यावरील सर्व ग्रामपंचायती, सरपंच, शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनाही या रॅलीमध्ये सहभागी केले आहे. (प्रतिनिधी)
असा असणार सायकल रॅलीचा प्रवास
शनिवारी मिरज, कवठेमहांकाळ, जत मार्गे गुड्डापूर हे ११७ किलोमीटर अंतर पार करून गुड्डापूर येथे मुक्काम. रविवारी १६ आॅक्टोबरला गुड्डापूरहून उमदी, जत येथून आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) मुक्काम करुन १२५ किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. १७ आॅक्टोबरला आरेवाडीतून आटपाडी, विटा तासगाव हे १३२ किलोमीटर अंतर पार करणार आहे. तासगाव येथे मुक्काम आहे. १८ आॅक्टोबरला तासगावहून पलूस, सागरेश्वर, देवराष्ट्रे, इस्लामपूरहून शिराळ्याला मुक्काम करणार आहे. हे अंतर ८४ किलोमीटर आहे. १९ आॅक्टोबरला शिराळ्याहून कोकरुड, सोनवडेतून चांदोली येथे मुक्काम आहे. हे अंतर ४० किलोमीटर आहे. २० आॅक्टोबरला चांदोली फॉरेस्ट वाईल्ड लाईफ सॅनेटरी (नेचर ट्रॅक) करून चांदोलीतच मुक्काम आहे. २१ आॅक्टोबरला चांदोलीहून कोकरुड, आष्टा मार्गे १०४ किलोमीटर अंतर पार करून सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात सांगता होणार आहे.
 

Web Title: 'Nirbhaya Rally' is full of honor in Sangli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.