चंद्रभागेच्या तीरी रंगला सांगलीच्या स्वच्छतादुतांचा मेळा, श्रमदानातून भक्तीचा गजर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 04:01 PM2024-07-22T16:01:41+5:302024-07-22T16:02:53+5:30
तरुणांनी स्वच्छता वारीचा जागर करीत पांडुरंगाची अनोखी सेवा केली
सांगली : देशभरातील लाखो भाविकांच्या भक्तीचा मेळा आषाढीला पार पडल्यानंतर सांगलीच्या तरुणांनी स्वच्छता वारीचा जागर करीत पांडुरंगाची अनोखी सेवा केली. श्रमदानातून चंद्रभागेच्या तीरी भक्तीचा गजर केला.
आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रसह इतर राज्यातील लाखो वारकरी पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. टाळ मृदंगाचा गजर करीत अवघे पंढरपूर भाविकांनी व्यापले होते. आषाढी संपल्यानंतर भाविक त्यांच्या गावी परतल्यानंतर सांगलीतील तरुणांची वारी पंढरपूरला निघते. अनोख्या भक्तीचा जागर करीत हे तरुण पांडुरंगाच्या सेवेत श्रमदान करतात.
सांगली शहरातील निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर व त्यांची टीम प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी वारीनंतर स्वच्छतेसाठी पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरी दाखल होत असतात.
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनंतर रविवारी दिवसभर सांगलीच्या स्वच्छतादुतांनी चंद्रभागेच्या तीरी स्वच्छतेसाठी श्रमदान करीत सुमारे दोन टन कचरा संकलन केले. चंद्रभागेच्या परिसरातील प्लास्टिकसह अन्य कचरा व नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात कपडे, फोटो, निर्माल्य दूर करीत नदीघाट स्वच्छ केला. यात रोहित कोळी, रोहित मोरे, मनोज नाटेकर, हणमंत दड्डणावर, ऋतुराज गडकरी आदी स्वच्छतादुतांनी सहभाग घेतला.
सहा वर्षांची परंपरा
निर्धार फाउंडेशनच्या युवकांची टीम गेल्या सहा वर्षांपासून शहरासह राज्यातील विविध ठिकाणी स्वच्छतेचे काम करीत आहे. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय युवकांनी पदरमोड करीत ही मोहीम अविरतपणे सुरू ठेवली आहे. समाजातील काही दानशूर व्यक्तींकडून केवळ साहित्य स्वरूपात मदत स्वीकारली जाते. यंदाच्या वारीसाठी भारत जाधव, अमोल घोडके, अनिल भगरे आदींनी बस सेवा, जेवण व साहित्यासाठी मदत केली.
आषाढी एकादशीनिमित्त वारकरी बांधव समतेचा संदेश देत वारीत सहभागी होत असतात. अशा अलौकिक वारीत स्वच्छतेची सेवा बजावण्यासाठी आम्ही एक सांगलीकर म्हणून सहभागी होऊन श्रमदान करीत आहोत. वारीच्या माध्यमातून स्वच्छतेचे कार्य महाराष्ट्रातील विविध भागात पोहोचत आहे. - राकेश दड्डणावर, अध्यक्ष, निर्धार फाउंडेशन, सांगली