निर्मळ मनाचा उद्यान पंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:24 AM2021-03-21T04:24:19+5:302021-03-21T04:24:19+5:30
शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याचा आल्हाददायक परिसर म्हणजे ‘फलोद्यान वैज्ञानिक संकुल’ झाले आहे. हे संकुल ज्यांनी उभे केले, ...
शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याचा आल्हाददायक परिसर म्हणजे ‘फलोद्यान वैज्ञानिक संकुल’ झाले आहे. हे संकुल ज्यांनी उभे केले, ते पिराजी विठ्ठल तथा पी. व्ही. जाधव यांचे नुकतेच निधन झाले. निर्मळ मनाचा उद्यान पंडित म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरात ते ओळखले जात.
१९७६ मध्ये संकेश्वरच्या शंकराचार्यांनी पी. व्ही. जाधव यांना ‘उद्यान पंडित’ ही पदवी दिली. जाधव यांचा जन्म १९३८ चा. आजरा तालुक्यातील उत्तूर हे त्यांचे जन्मगाव. मात्र त्यांचे कार्यक्षेत्र राहिले ते कागल-कोल्हापूर आणि शेवटी शिरोळ-जयसिंगपूर. कोल्हापूर जिल्हा परिषदेत १९५८ मध्ये फलोद्यान अधिकारी म्हणून ते रुजू झाले. मात्र शिरोळ येथे दत्त साखर कारखान्याची उभारणी झाल्यावर अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी कारखान्यावर फलोद्यान अधिकारी म्हणून बोलावून घेतल्यापासून ते तेथेच रमून गेले. १९९६ मध्ये ते निवृत्त झाले. त्यांच्यावर दिवंगत खासदार दत्ताजीराव कदम आणि आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या कार्याचा प्रभाव होता. कारखान्याच्या सत्तर एकर क्षेत्रावर त्यांनी आंबा, नारळ, चिकू, पेरू, डाळिंब, गुलाब, हिरवळ व जंगली झाडांची लागण करून उजाड माळाचे नंदनवन केले.
शिक्षण क्षेत्रातील मोठ्या पदव्या न घेता अनुभवाच्या जोरावर जाधव यांनी अनेक संस्थांचा परिसर रमणीय केला. दत्त कारखान्यात काम करीत असतानाच इतर संस्थांचे परिसरही त्यांनी फुला-फळांनी फुलवले. अजिंक्यतारा साखर कारखाना (सातारा), आयको स्पिनिंग मिल्स (इचलकरंजी), नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी (साजणी), शेतकरी सूतगिरणी (इचलकरंजी), डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल (कोल्हापूर) ही त्यातील काही उदाहरणे.
पी. व्ही. जाधव अत्यंत सभ्य, निर्मळ मनाचे, अतिकष्टाळू आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून दक्षिण महाराष्ट्रात ओळखले जात. आयुष्याच्या अखेरपर्यंत सेवाभावी वृत्तीने मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रात चिकित्सक संशोधक म्हणून ते सर्वज्ञात होते. स्थानिक प्रचलित शेवग्याच्या जातीतून ‘दत्त सिलेक्शन’ ही नवीन जात शोधून काढली. जास्वंद व सीताफळावर ‘सॉफ्टवुड’ पद्धतीने कलम करण्याच्या नवीन पद्धतीचा प्रसार केला. हापूस आंब्यास दरवर्षी बहार येण्यासाठी छाटणी पद्धतीचा यशस्वी प्रयोग त्यांनी साकारला.
‘जो पिकवी भाजी फळे.. तया संपत्ती आरोग्य मिळे..’ हा त्यांचा शेतकरी बांधवांना किंबहुना साऱ्या जनतेला संदेश होता.
त्यांनी ग्रंथलेखन करून आपले ज्ञान सर्वसामान्यांना दिले. त्यांचे काही ग्रंथ ‘माैज’ या मान्यवर प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले. ‘आंबा लावा कलमी.. फळे या हुकमी’, फळबाग लावा, फळबाग खते, नारळ लागवड, सेंद्रिय शेती असे सुमारे १२ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. शिवाय फळबाग लागवड आणि उद्यान निर्मितीसाठी पुस्तिका प्रकाशित केल्या. विविध दैनिके व कृषिविषयक नियतकालिकांतून लेखन केले. आकाशवाणी तसेच दूरदर्शनवरून कृषीविषयक प्रबोधनही त्यांनी सातत्याने केले. इचलकरंजी येथील फाय फाऊंडेशनचा पुरस्कार, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान (कोल्हापूर) चा ‘उद्यान भूषण’ पुरस्कार, मॅग्नम फाऊंडेशन (नागपूर) चा ‘पश्चिम महाराष्ट्र मित्र पुरस्कार’, वर्धा येथील शेतकरी एकता मंचचा ‘कृषिनिष्ठ पुरस्कार’ आरसीएफ (मुंबई) यांचे गौरवचिन्ह अशा चाळीसवर पुरस्कारांनी जाधव यांना सन्मानित करण्यात आले.
कृषक समाजाच्या सेवेला वाहून घेतलेला हा निर्मळ मनाचा उद्यान पंडित आज हरपला आहे.
- डॉ. विष्णू वासमकर, सांगली.