जिल्ह्यातील १७ गावांना निर्मलग्राम पुरस्कार
By admin | Published: December 11, 2014 10:39 PM2014-12-11T22:39:09+5:302014-12-11T23:50:19+5:30
सांगली दुसरा : जतची आठ गावे
सांगली : केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छ भारत अभियान मोहिमेअंतर्गत निर्मलग्राम योजनेचा २०१३-१४ चा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यातील ५८७ गावांना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील १७ गावांचा समावेश आहे. यंदा ११९ गावे निर्मलसाठी पात्र ठरली होती. परंतु त्यातील केवळ १७ गावांनाच निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. पुणे विभागात सांगलीचा दुसरा क्रमांक आला आहे.
केंद्र शासनाने शंभर टक्के शौचालय मुक्तीसाठी निर्मलग्राम योजनेतर्गंत ७०४ गावांपैकी ४७५ गावे निर्मल झाली आहेत, तर अद्याप २२९ गावे निर्मल होण्यापासून दूर आहेत. मागील पाच वर्षात जिल्ह्यातील २४ गावे निर्मल झाली होती. परंतु त्यानंतर प्रशासन आणि गावकऱ्यांच्या दुर्लक्षामुळे यामध्ये थोडी ढिलाई आल्याचे चित्र होते.
२०१३-१४ या वर्षात ११९ गावे निर्मलग्राम योजनेसाठी पात्र ठरली होती. सहा महिन्यांपूर्वी शासनाने नेमलेल्या समितीकडून गावांची पाहणी झाली होती. आज याचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सर्वाधिक आठ गावे समाविष्ट आहेत. यामध्ये बोर्गी बु., अंतराळ, जालिहाळ खुर्द, करेवाडी, कुलाळवाडी, शेड्याळ, मिरवाड आणि वाशाणचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील चिंचाळे, खानापूरमधील बामणी, भेंडवडे, पारे, मिरजेतील बामणोळी, शिराळ्यातील चरण, तासगावातील डोंगरसोनी, मतकुणकी, शिरगाव या गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)